Diwali 2022 : मुघलांनी आणलेला दारूगोळा भारतीय सण उत्सवाचा अविभाज्य भाग कसा बनला ? जाणून घ्या रंजक इतिहास!

भारतीयांच्या सर्वात मोठ्या दिवाळी (Diwali 2022 ) सणाला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की, नवे कपडे, फराळ, गिफ्ट, मिठाई याची मोठी रेलचेल असते. त्याचबरोबर फटाके हे दिवाळीचे मुख्य आकर्षण असते. फटाक्यांच्या दणदणाटाशिवाय दिवाळी साजरी होऊ शकत नाही.अनेक शतकांपासून विविध देशांत सण-उत्सवाच्या काळात फटाके उडवले जातात; मात्र या फटाक्यांचा उदय कसा झाला, हे तुम्हाला माहिती आहे का? सध्या पर्यावरणासाठी घातक ठरत असलेल्या फटाक्यांना कित्येक शतकांचा इतिहास आहे. तो थोडक्यात जाणून घेऊयात!

Diwali 2022, How did Ammunition ब brought by Mughals become an integral part of Indian festival celebration? Learn interesting history,

भारतामध्ये मुघलांबरोबर गनपावडरचं आगमन झालं. पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये गनपावडर आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. बाबरच्या आधुनिक तोफखान्यासमोर इब्राहिम लोधी टिकू शकला नाही आणि त्यामुळे बाबरनं युद्ध जिंकलं.पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच 1526 नंतर भारताला गनपावडरची माहिती झाली. तेव्हापासूनच भारतीयांना फटाक्यांची (आतषबाजी) ओळख झाली.

अकबराच्या काळात विवाह आणि उत्सवांमध्ये फटक्यांचा वापर होऊ लागला.ज्या गनपावडरपासून फटाके तयार होत, ती महाग होती.म्हणून फटाके हे प्रतिष्ठेशी जोडले गेले होते. दीर्घ काळ ते फक्त शाही घराणी आणि श्रीमंत लोकांच्या मनोरंजनाचं साधन होते. पूर्वी लग्नात फटाके वाजवून विविध कला दाखवणारे करणारे कलाकार असायचे. त्यांना ‘आतिषबाज’ म्हणत.फटाक्यांचं मूळ चीनमध्ये आढळतं.

चीनमध्ये सहाव्या ते नवव्या शतकात गनपावडरचा शोध लागला. तांग राजवंशाच्या काळात हा शोध लागला होता. सुरुवातीच्या काळात जेव्हा चिनी नागरिक बांबू आगीमध्ये जाळत तेव्हा त्यात असलेले हवेचे बुडबुडे फुटायचे. त्यांना आपण पृथ्वीवरील नैसर्गिक फटाके म्हणू शकतो. आगीत बांबू जाळल्यानंतर होणाऱ्या आवाजामुळे वाईट शक्तींचा नाश होतो, असा चीनमध्ये समज आहे.

Diwali 2022, How did Ammunition ब brought by Mughals become an integral part of Indian festival celebration? Learn interesting history,

त्यानंतर चीनमध्ये पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि चारकोल यांचं मिश्रण करून गनपावडर तयार करण्यात आली. ही पावडर बांबूच्या आवरणात भरून तो जाळला असता, त्याचा मोठा स्फोट होतो, हे तिथल्या माणसांच्या लक्षात आलं. पुढे बांबूची जागा कागदाच्या पुंगळ्यांनी घेतली.

भारतामध्ये आधुनिक फटाके बनवण्याचं काम ब्रिटिश सरकारच्या काळात कलकत्त्यात सुरू झालं.19व्या शतकात फटाके बनवण्यासाठी एका लहान मातीच्या भांड्याचा वापर होत असे. त्यात गनपावडर टाकून ते जमिनीवर आपटलं, की त्यातून प्रकाश आणि आवाज बाहेर पडायचा. कदाचित त्यामुळेच त्याला ‘फटाका’ असं नाव मिळालं असावं. तेव्हा त्याला ‘भक्तापू’ किंवा ‘बंगाल लाइट्स’ असं म्हणत.ब्रिटिश सरकारच्या काळात बंगाल हे उद्योगाचं केंद्र होतं.

तिथे माचिसची फॅक्टरी होती. त्यामध्ये गनपावडरचा वापर केला जात असे. त्यामुळे तिथेच आधुनिक भारतातला पहिला फटाका कारखाना स्थापन झाला.कारखाना नंतर तमिळनाडूमधल्या शिवकाशी येथे ट्रान्स्फर झाला. तमिळनाडूमधलं शिवकाशी हे भारतातलं फटाके बनवण्याचं सर्वांत मोठं केंद्र आहे.

फटाके शिवकाशीपर्यंत पोहोचण्याची गोष्टही रंजक आहे.पी. अय्या नाडर आणि त्यांचा भाऊ षण्मुगा नाडर 1923 मध्ये बंगालमधल्या एका माचिस फॅक्टरीत काम करण्यासाठी आले होते. तिथे त्यांनी माचिस बनवण्याचं कौशल्य आत्मसात केलं. आठ महिन्यांनंतर नाडर बंधू कलकत्त्याहून शिवकाशीला परतले.तेव्हा त्यांनी जर्मनीतून मशीन्स आयात करून अनिल ब्रँड आणि अय्यन ब्रँडच्या माचिसची निर्मिती सुरू केली. नंतर, त्यांनी फटाकेही बनवले आणि बघता बघता तमिळनाडूतली शिवकाशी ही भारताची ‘फायरवर्क कॅपिटल’ बनली.

तमिळनाडूच्या विरुधनगर जिल्ह्यातल्या शिवकाशीमध्ये सध्या फटाकेनिर्मितीचे सुमारे आठ हजार लहान-मोठे कारखाने कार्यरत आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे एक हजार कोटी रुपये आहे. दरम्यान, 1940 मध्ये ब्रिटिश सरकारने इंडियन एक्प्लोसिव्ह कायदा बनवला. त्यामुळे फटाके बनवण्यासाठी आणि बाळगण्यासाठी परवाना घेणं आवश्यक झालं. म्हणूनच फटाक्यांची पहिली अधिकृत फॅक्टरी 1940मध्ये बांधली गेली, असं म्हणतात.