विशेष : राजर्षी शाहू महाराजांनी आखलेल्या “या” धोरणांविषयी तुम्हाला माहित आहे का ? चला तर मग जाणून घेऊया !
आरक्षणाचे जनक असलेल्या लोकराजा शाहू महाराजांनी शोषित जाती, वर्गाला विकासाच्या धारेत येण्यासाठी समान संधी मिळावी यासाठी अनेक अंगांनी प्रयत्न केले.( the father of reservation LokRaja Shahu Maharaj)त्याबाबतीत आपण भरपूर लिहीतो, बोलतो आणि ते महत्वाचेच आहे.पण शाहू महाराजांनी संपत्ती निर्माणातून समाजात जास्तीच्या संधी निर्माण करण्यासाठी जे नियोजनबध्द प्रयत्न केले त्याबद्दलही आपण समजून घेतले पाहिजे याविषयी सांगत आहेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे. (senior social activist Subhash Ware)
Lok Raja Shahu Maharaj, the father of reservation, tried his best to give equal opportunity to the exploited castes and classes to come to the forefront of development. We write a lot about it, and that’s important. But we should also understand the planned efforts made by Shahu Maharaj to create more opportunities in the society through wealth creation, says senior social activist Subhash Ware.
सार्वत्रिक पाटबंधारे धोरण
सततच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी अनेक अंगांनी विचार व प्रयोग करुन शाहू महाराजांनी 1902 सालात कोल्हापूर संस्थानाचे सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर केले होते. राधानगरी धरण हे शाहू महाराजांनी आपले जीवितकार्य मानले होते. राधानगरी धरण हे त्या व्यापक पाटबंधारे धोरणाचाच एक भाग होता. परिणामी कोल्हापूर जिल्हा आज सिंचनाखालील क्षेत्रात अग्रेसर आहे.
किंग एडवर्ड अॕग्रिकल्चरल इंस्टिस्ट्यूट
शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांनी शेतीबाबतचे आधुनिक ज्ञान मिळवावे, सुधारित शेतीपध्दतीचा अवलंब करावा म्हणून 1912 साली शाहू महाराजांनी किंग एडवर्ड अॕग्रिकल्चरल इंस्टिट्यूटची स्थापना केली. जोडीला आधुनिक शेती अवजारांचे म्युझियम सुरु केले. सांस्कृतिक व धार्मिक उत्सवप्रसंगी शेतकी प्रदर्शने भरवायला सुरुवात केली. सुधारित शेतीचे अनेक आयाम शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी शेती अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.नेहमीच्या पिकांऐवजी रोख पैसा देणारी नवी पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. कोल्हापूर संस्थानाच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगररांगात चहा, काॕफी, रबर यांचे मळे तयार केले. यापैकी चहाच्या मळ्याचा प्रयोग यशस्वी होऊन पन्हाळा टी नंबर 4 हा चहाचा विशेष ब्रँड त्यावेळी विकसित केला होता. हा ब्रँड त्या काळात भारतातील अनेक संस्थानिक व राजे रजवाड्यांच्या पसंतीचा चहा ब्रँड होता.
शाहूपूरी, जयसिंगपूर बाजारपेठांची निर्मिती
शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी कमी अंतरावर आणि आपली हक्काची बाजारपेठ असावी तसेच बहूजन समाजाने व्यापार-उद्योग हे आपले क्षेत्र नाही ही मानसिकता सोडून हिंमतीने त्या क्षेत्रात उतरावे यासाठी शाहू महाराजांनी सतत बहुजनांमधील धडपड्या तरुणांना प्रोत्साहन आणि धोरणात्मक बळ दिले. शाहूपूरी व जयसिंगपूर बाजारपेठांची निर्मिती याच दृष्टीकोनातून झालेली दिसते.
नव्या उद्योगांची उभारणी
कोल्हापूर संस्थानात नवे उद्योग उभे रहावेत व त्यातून रयतेसाठी रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केले. 1906 मधे “शाहू छत्रपती मिल्स” ही कापडगिरणी उभी रहावी यासाठी जागा, पाण्याची सोय आणि भांडवल पुरवले गेले. याला पूरक म्हणून गडहिंग्लज, शिरोळ, इचलकरंजी येथे जिनिंग फॕक्टरीज उभ्या राहिल्या. 1912-13 च्या दरम्यान कोल्हापूर संस्थानात आॕईल मिल, साॕ मिल, फाउंड्री, इलेक्ट्रिक कंपनी, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी असे अनेक उद्योग सुरु झाले. हे सर्व पहिल्यांदाच घडत होते ते केवळ शाहू महाराजांच्या धाडसी धोरणीपणामूळे. या उद्योगांना प्रशिक्षित कामगार वर्ग मिळावा म्हणून राजाराम इंडस्ट्रियल स्कुलची स्थापना करण्यात आली. संस्थानाबाहेरीलही किर्लोस्कर सारख्या उद्योगांना शाहू महाराजांनी सहकार्य केले. शाहू महाराजांच्या या प्रयत्नातून संस्थानात कृषी-औद्योगिक प्रदर्शन भरवायला सुरुवात झाली. कसबी कारागिरांना शेतीशी संबंधित नवी नवी अवजारे संशोधित करुन ती बनवण्यास प्रोत्साहन दिले गेले.
शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली काही नवे उद्योगही संस्थानात सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यासाठी डी. एस. शाळीग्राम नावाचे रसायनतज्ञाची इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सुगंधी औषध तेल उद्योग, काष्ठार्क तेल उद्योग यांची यशस्वी उभारणी हे याचे फलित होते. यातूनच पुढे लोणारी कोळसा, व्हिनिगर, डांबर या पदार्थांची निर्मितिही संस्थानात होऊ लागली. मधुमक्षिकापालन हा उद्योग आज चांगलाच प्रचलित आहे पण साधारण एकशे दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानात मधुमक्षिकापालन हा उद्योग रुजावा व भरभराटीस यावा यासाठी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न झालेले दिसतात.
सहकारी संस्था उभारणीचा कायदा
आधी उल्लेख केलेल्या छत्रपती शाहू मिल्सच्या उद़्घाटन प्रसंगी लोकराजा शाहू महाराज म्हणाले होते, “कोणत्याही परिस्थितीत हा चालू केलेला उद्योग बड्या गिरणी मालकांच्या किंवा धनिकांच्या ताब्यात जाणार नाही याची कोल्हापूरकरांनी काळजी घ्यावी”. केवढा हा धोरणीपणा. याच भूमिकेला धरुन शाहू महाराजांनी पुढे 1912 साली संस्थानात सहकारी संस्थाविषयक कायदा जारी केला. सहकारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी सहकारी निबंधक म्हणजे रजिस्ट्रारची नियुक्ती करण्यात आली आणि वर्षाच्या आत “दि कोल्हापूर अर्बन को-आॕपरेटिव सोसायटी लि.” ची उभारणी झाली. 1929 सालापर्यंत कोल्हापूर संस्थानात 37 सहकारी संस्थांंची उभारणी झालेली आपल्याला दिसते.आज कोल्हापूर जिल्हा जो आपल्याला हिरवागार दिसतोय, सहकारी साखर कारखाने, सहकारी दुध उत्पादक संघ, सहकारी पाणीपुरवठा सोसायट्यांच्या माध्यमातून ग्रामीण बहुजनांची क्रयशक्ती वाढवताना दिसतोय त्याची पायाभरणी लोकराजा शाहू महाराजांच्या दुरदर्शी व खंबीर नेतृत्वात आहे.
वसतीगृह उभारणीची चळवळ उभी करुन बहुजन आणि शोषित जातीसमुहांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करणारे शाहू महाराज, सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे शाहू महाराज, भटके विमुक्त समाजावरील गुन्हेगारीचा कलंक पुसत त्यांचा सखा बनलेले शाहू महाराज, आरक्षण धोरण पहिल्यांदा राबवणारे शाहू महाराज, जातीय आत्याचाराविरोधात ठामपणे उभे रहात जातीभेद संपविण्यासाठी स्वतःच्या कुटुंबातच मराठा-धनगर विवाह लावून देणारे शाहू महाराज, पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती समुहातील नागरिकांना संस्थानाच्या प्रशासनात सामावून घेण्याबरोबरच त्यांना व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन देणारे व तो व्यवसाय ग्राहकांनी स्विकारावा म्हणून स्वतःच ग्राहक बनणारे शाहू महाराज, विधवा विवाहाचा कायदा करणारे शाहू महाराज, आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातील वेदोक्त प्रकरणात बहुजन समाजाचा आत्मसन्मान उंचावण्यासाठी ब्राम्हण्यवादाचा ताकदीने मुकाबला करणारे शाहू महाराज, आयुष्याच्या उत्तरार्धात सत्यशोधक विचार प्रसारासाठी वाहून घेणारे शाहू महाराज अशी शाहू महाराजांची माझ्यासारख्याला भावणारी अनेक रुपे आहेत. पण त्याचबरोबर संधीच्या समानतेचा आग्रह धरतानाच संपत्ती निर्माणाच्या दुरदर्शी धोरणातून अधिक संधींची निर्मिती करणाऱ्या शाहू महाराजांवरही आपण प्रेम करुया. त्यांच्या या रुपाचे अनुकरण राज्यकर्ते करतील यासाठी जनसंघटनांचा दबाव वाढवूया. समाज म्हणून आपणही त्या धोरणांचा पाठपूरावा करुया. आज शाहू महाराजांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी यापेक्षा अधिक चांगला निर्धार कुठला असेल.
( लेखातील संदर्भ : राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या पुस्तकातील आहेत)