Dr. Kailash Rathi Nashik : नाशिकमधील सुयोग हाॅस्पीटलचे संचालक डाॅक्टर कैलास राठी (Dr Kailash Rathi) यांच्यावर प्राणघातक हल्ला (Attack) करण्याची घटना घडली आहे.महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेतील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात नाशिकच्या पंचवटी पोलिसांना (Panchvati Police Nashik) यश आले आहे.राजेंद्र मोरे (Rajendra More) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे.
नाशिकच्या पंचवटी येथील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डाॅ कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची घटना 23 रोजी रात्री घडली होती. या घटनेतील हल्लेखोर राजेंद्र मोरे हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी फिल्डींग लावली होती.अखेर पंचवटी पोलिसांच्या पथकाने आडगाव नाका परिसरातून त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज 24 रोजी सायंकाळी करण्यात आली.
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या डाॅ कैलास राठी हल्ला प्रकरणात पोलिसांनी वेगवान तपास करत या प्रकरणातील महत्वाचे धागेदोरे शोधले होते. डॉ. कैलास राठी यांच्यावर त्यांच्याच हॉस्पिटलच्या माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.
डॉ. कैलास राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन 2022 मध्ये डॉ. राठी यांची रोहिणी यांचे पती राजेंद्र मोरे यांच्यासमवेत ओळख झाली. काही काळानंतर त्यांनी मोरे यांच्या माध्यमांतून म्हसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता. गत दीड वर्षात डॉ. राठी यांनी मोरेला अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते. या पैशांसाठी राठी यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता.
दरम्यान, राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते. डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहेत, असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला. काल रात्री तो डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांचे शाब्दिक वाद झाले. त्यानंतर मोरे याने डाॅ राठींवर कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला. जखमी डाॅक्टर राठींवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रात्री अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. हाॅस्पीटलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगाने तपास हाती घेतला.
डाॅ कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या राजेंद्र मोरे याला बेड्या ठोकण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. त्याला आडगाव नाका परिसरातून अटक करण्यात आली आहे.