जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या अंधाऱ्या राती गावभर फिरणाऱ्या ड्रोन्सची दहशत आहे. अंधाऱ्या काळोखात अचानक ड्रोन अकाशात घिरट्या घालत येतो, गावावर चक्कर मारतो, वाडी वस्त्यांवरही जातो, नागरिक त्याचा पाठलागही करतात पण तो अचानक गायब होतो, तो कुठून येतो, त्याला कोण चालवतं ? याचा कसलाच थांगपत्ता लागत नाही. मग अचानक काही दिवसानंतर त्या गावात चोरीची घटना समोर येते, असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या घिरट्या वाढल्यानं नागरिक चक्रावून गेले आहेत. ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून ड्रोनची अक्षरश: दहशत असल्याचं दिसून येतंय. ड्रोनच्या भितीमुळं लोक रात्री बाहेर पडायला तयार नाहीत. चोऱ्या वाढल्यानं हातावर हात ठेवून बघत बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या काही दिवसात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन फिरत असल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे.
बीड, संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या अज्ञात ड्रोनच्या दहशतीमुळे घबराट आहे. चोरीच्या उद्देशाने कोणी असे करत तर नाही ना? या भीतीमुळे ग्रामीण लोक रात्रभर जागून काढत आहेत. बीड जिल्ह्यात गुरुवारी सुमारे 33 गावांमध्ये ड्रोन उडल्याच्या तक्रारी आल्यामुळे पोलीस देखील अलर्ट झाले आहेत.
चोरीसाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर ?
ड्रोनचा वापर करून गावागावात हायटेक टोळक्यांच्या चोरीमारीचे प्रकार वाढले आहेत. शिवारातील लाखो रुपयांचा शेतमाल चोरण्याच्या तसेच जबरी चोरीच्या अनेक घटना राज्यातील वेगवेगळ्या भागात समोर आल्या आहेत. चोरांनी चोरी करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. त्यामुळं शेताची निगराणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बांधलेले टॉवरदेखील काही करू शकत नसल्याचं शेतकरी सांगतात.
अंधाऱ्या राती अचानक अकाशात दिसणारा हा ड्रोन कोणाचाय, कुठून आला, कशासाठी आणि कोण उडवतंय याचा पोलिसांनाही थांगपत्ता नसल्याची परिस्थिती आहे. ड्रोनच्या घिरट्या आणि गावात होणाऱ्या चोऱ्यांमुळं ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे. ड्रोनच्या धास्तीनं लोकांना रात्री गस्त घालावी लागत आहे.
मागील आठ दहा दिवसांपुर्वी ड्रोनच्या घिरट्या
मागील आठवड्यात जामखेड तालुक्यातील जवळा, नान्नज, मतेवाडी, मुंजेवाडी परिसरातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी अकाशात ड्रोन फिरत असल्याचे आढळून आले होते. रात्री साडेदहा ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत काही भागात हे ड्रोन घिरट्या घालत होते. मुंजेवाडी-खुंटेवाडी परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास शेतकरी शेतात उडदाची सोंगणी करीत असताना त्यांना आकाशात ड्रोन घिरट्या घालताना दिसले होते. त्यानंतर ते ड्रोन शेतकऱ्यांच्या घरांवर अर्धा तासापेक्षा अधिक वेळ घिरट्या घालत असल्याचे आढळले. त्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकांना दूरध्वनी करीत ड्रोनचा पाठलाग केला. मात्र, ते दिसेनासे झाले.
नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये – पोलिस निरीक्षक महेश पाटील
जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यात ड्रोन येऊन गेला अन् तालुक्यात चोरीची घटना घडली असे काही नाही, चोरीचा आणि त्या ड्रोनचा संबध नाही, तालुक्यात ज्या भागात चोरी झाली त्या प्रकरणातील आरोपींचा लवकरच छडा लावला जाईल, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अवाहन यावेळी महेश पाटील यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना केले आहे.
नक्की कुठला डेटा कलेक्ट केला जातोय ?
पाथर्डी, नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा येथील ड्रोनच्या घिरट्या बंद झाल्यानंतर मागील.आठवड्यात कर्जत-जामखेड तालुक्यातील गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. रात्रीच्या अंधारात ड्रोन वेगवेगळ्या गावांवरून फिरवून नेमका कुठला डेटा गोळा केला जातोय, याचा शोध आजवर लागला नसल्याने अंधाऱ्या राती अकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचे गूढ कायम आहे.