निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असलेल्या मतदारांना बसणार चाप, 1 ऑगस्टपासून मतदानकार्ड जोडणार आधारकार्डशी – श्रीकांत देशपांडे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मतदारांची ओळख पटविण्यासाठी आणि मतदार यादीतील नोदींचे प्रमाणीकरण करण्यासाठी मतदार ओळखपत्रे आधार कार्डशी जोडली जातील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे एकापेक्षा अधिक मतदारसंघात नाव असलेल्या मतदारांना आता चाप बसणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 1 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात मतदार ओळखपत्रे आधार कार्डशी जोडण्याची मोहीम सुरू करणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मतदारयादीत दुबार नावे असणे, पत्ता अपूर्ण असे अनेक दोष मतदार यादीमध्ये आढळून येतात. या पार्श्वभूमीवर आता मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. एकाच व्यक्तचे एकापेक्षा अधिक मतदार संघात किंवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी आहे का हे तपासण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी उपयुक्त ठरणार आहे.
श्रीकांत देशपांडे म्हणाले, उद्या सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. राजकीय पक्षांना नवीन बदलांची माहिती देण्यात येणार आहे. कोणताही आधार क्रमांक, पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. आधार क्रमांक डिजिट्सला मास्किंग केले जाणार आहे. सारखे फोटो असणारे फोटो शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत 40 लाख व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे. मतदार यादीत 20 लाख बनावट नावे आढळली आहेत.