माजी शिक्षण अधिकारी पोपट काळे यांच्या ‘काजवा’ आत्मकथनास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार जाहीर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे साहित्यक्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा निवड समितीकडून करण्यात आली आहे. गेल्या २२ वर्षांपासून साहित्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या साहित्यिकांना प्रतिष्ठानकडून गौरविण्यात येत आहे.सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठी माजी शिक्षण अधिकारी पोपट श्रीराम काळे यांच्या ‘काजवा’ या आत्मकथनपर पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.
साहित्यक्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या एका ज्येष्ठ साहित्यिकाला दरवर्षी मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी पुणे येथील लेखक, संपादक व विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांची निवड करण्यात आली आहे. रु. ११,००० रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरिता देण्यात येणाऱ्या प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारासाठी पोपट श्रीराम काळे यांच्या मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘काजवा’ ह्या आत्मकथनाची निवड करण्यात आली आहे. रु.११,००० रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रसाद बन ग्रंथगौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नागपूर येथील अरुणा सबाने यांच्या मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सूर्य गिळणारी मी ह्या आत्मकथनाची तसेच वसई येथील जॉन गोन्सालवीस यांच्या ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘ज्याच्या हाती पुस्तक’ ह्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रु. ५००० रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रसाद बन राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कारासाठी उस्मानाबाद येथील समाधान शिकेतोड यांच्या राजहंसने प्रकाशित केलेल्या ‘जादूई जंगल’ ह्या किशोर कादंबरीची निवड करण्यात आली आहे. रु. ५००० रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्थानिक ग्रंथगौरव पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील दोन साहित्यिकांना देण्यात येणार आहे. महेश मोरे यांनी लिहिलेल्या आणि लोकवाङ्मयगृह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बोऱ्याची गाठ’ ह्या कादंबरीची, तसेच डॉ. भगवान अंजनीकर यांच्या निर्मल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सावली शोधाची अर्धवट गोष्ट’ ह्या कादंबरीची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रु. २५०० रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कारासाठी नांदेड येथील दै. ‘उद्याचा मराठवाडा’च्या ‘मुक्तपर्व’ दिवाळी अंकाची निवड करण्यात आली आहे. राम शेवडीकर हे ह्या दैनिकाचे संपादक असून प्रवीण बर्दापूरकर हे ‘मुक्तपर्व’ दिवाळी अंकाचे अतिथी संपादक आहेत. रु. ५००० रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रा. भु. द. वाडीकर आणि प्रा. डॉ. मधु सावंत यांच्या परीक्षण समितीने ह्या पुरस्कारांची निवड केली. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि वाड्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत यांनी नांदेड येथे या पुरस्कारांची घोषणा केली. प्रतिष्ठानच्या वाङ्मय पुरस्कारांचे हे २२वे वर्ष आहे.
दरवर्षी अतिशय दिमाखदार समारंभात ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते, पण यंदा काही अपरिहार्य कारणास्तव पुरस्कार विजेत्यांना हे पुरस्कार घरपोच पाठविण्यात येणार आहेत, असे प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.