Hindu Temple Land Scam । आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थानच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल करा – औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश, भूमाफियांमध्ये उडाली मोठी खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Hindu temple land scam । 23 ऑक्टोबर 2022 । बीडच्या आष्टी तालुक्यातील वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यानंतर आता ऐन दिवाळीत हिंदू देवस्थान जमीन घोटाळा (Ashti Taluka Hindu Temple Land Scam Case) चर्चेत आला आहे. हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्याची औरंगाबाद हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. (Aurangabad High Court)
आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्यात सहभागी असलेल्या भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहेत.या प्रकरणात तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने भूखंड माफीया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह इतर भूमाफीयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
आष्टी तालुक्यातील वक्फ बोर्ड जमीन घोटाळा उघडकीस आल्यानंतर हिंदू देवस्थान असलेल्या विठोबा देवस्थान मुर्शदपूर, विठोबा देवस्थान पांढरी, विठोबा देवस्थान खडकत, खंडोबा देवस्थान बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा उघडकीस आला आहे.
या प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेली तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरावी, असेही म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर न्या. मंगेश पाटील आणि न्या. अभय वाघवसे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले आहेत. वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र, हिंदू देवस्थानच्या प्रकरणात अजूनही गुन्हे दाखल करीत नाहीत, ते गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी केली. यावर तक्रारदाराचे निवेदनच एफआरआय म्हणून गृहीत धरून, फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
हायकोर्टाच्या या आदेशामुळे भूखंड माफीया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह इतर भूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.आष्टी तालुक्यातील या प्रकरणात आता कोणा कोणावर गुन्हे दाखल होणार याकडे बीड जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थान आणि वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याचे काही धागेदोरे जामखेडमध्येही असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जामखेडही या प्रकरणात चर्चेत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.