जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप प्रणित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तारीख पे तारीख हा खेळ सुरू आहे. सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळाचा शपथविधी न झाल्यावर सरकार विरोधात चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. अश्यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे.
राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे राज्याचा गाडा हाकत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करणार या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराला थोडा विलंब झाला असला तरी येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा आम्ही विस्तार करू, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याने संभाव्य मंत्रिमंडळात तब्बल 42 मंत्री असू शकतात, यात भाजपचे 27 तर शिंदे गटाकडे 13 तसेच काही अपक्ष आमदारांनाही मंत्रिमंडळ संधी दिली जाऊ शकते. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळात काही नव्या चेहर्यांना संधी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान शिवसेना विरुद्ध शिंदे गट ही लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली. या संघर्षावर येत्या 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यात कोर्टाचा काय निर्णय येतो यावर शिंदे सरकारचे भविष्य अवलंबून आहे. याच कारणामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला असल्याचे बोलले जात याशिवाय भाजप आणि शिंदे गटात काही मुद्द्यांवर अजून एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याने शिंदे मंत्रिमंडळ कोणाची वर्णी लागणार? मंत्रिमंडळाचा विस्तार एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यांत होणार ? मंत्रिमंडळात कोणाला डावलले जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असली तरी, एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येणार याकडे संबंध देशाचे लक्ष लागले आहे.