मोठी बातमी : अखेर अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका, नागवडे कुटुंबाने स्विकारले अजित पवारांचे नेतृत्व !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाच्या बहरलेल्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचा अभेद बालेकिल्ला म्हणून श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंबाकडे पाहिले जायचे. गेल्या काही वर्षांत राजकारणात अनेक उलटफेर झाले. राजेंद्र नागवडे यांनी अनेकदा पक्षांतरे केली. पण आमदारकीचे स्वप्न काही पुर्ण झाले नाही. पुन्हा काँग्रेस पक्षात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. पक्षाला ऊर्जितावस्था यावी यासाठी ते प्रयत्न करतील असे बोलले जायचे पण ही अपेक्षा फोल ठरली. आता नागवडे यांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Finally, congress suffered major setback in Ahmednagar district, Nagwade family accepted leadership of Ajit Pawar, Rajendra Nagwade Anuradha Nagwade join ncp

सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, त्यांच्या पत्नी अनुराधाताई नागवडे यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. नागवडे यांनी काँग्रेसची पुन्हा साथ सोडली. नागवडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. श्रीगोंदा तालुक्यात नागवडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. साखर कारखान्याच्या माध्यमांतून नागवडे यांचे तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. याचा मोठा फायदा आता राष्ट्रवादीला होईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुण्यात रविवारी मेळावा पार पडला. बालेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत नागवडे हे राष्ट्रवादीत दाखल झाले. नागवडे यांच्याबरोबर दिपकशेठ शिवाजीराव नागवडे, बाबासाहेब सहादु भोस, बाळासाहेब नाहटा, धनसिंग विठ्ठलराव भोयटे, राकेश कैलासराव पाचपुते, सखाराम दगडु जगताप, ज्ञानदेव पांडुरंग गवते, आप्पासाहेब बाबा धायगुडे, बंडु नामदेव जगताप, शरदराव नवले, सौ.माधुरी आदेश नागवडे, सुरेखा सुभाष शिर्के, सौ.सुरेखा किसनराव लकडे सह आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांतभाऊ गायकवाड यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

आमदारकीचा एल्गार पण पुढेअडचणींचा डोंगर !

यंदा होणारी विधानसभेची निवडणुक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच असा चंग नागवडे दाम्पत्याने बांधला आहे. यंदा माघार नाही असा कार्यकर्त्यांचाही निर्धार आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच विधानसभा निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी सुरु आहे. अनुराधाताई नागवडे ह्या विधानसभेच्या उमेदवार असतील असे बोलले जात आहे.त्यादृष्टीने मतदारसंघात वातावरण निर्मिती सुरु आहे. अश्यातच नागवडे दाम्पत्याने आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

shital collection jamkhed

महायुतीत श्रीगोंद्याची जागा भाजपकडे आहे. बबनराव पाचपुते विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजप राष्ट्रवादीला सोडणार नाही. शरद पवार गटाकडून माजी आमदार राहूल जगताप रिंगणात असतील. नागवडे दाम्पत्याने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून नागवडे आमदारकीवर दावा ठोकताना दिसणार आहेत. त्यामुळे आगामी काळात महायुतीत नागवडे यांच्यामुळे बिघाडी तर होणार नाही ना ? हे पाहणे रंजक ठरेल. तूर्तास नागवडेंनी आमदारकीचा एल्गार केला जरी असला तरी आगामी काळात नागवडे दाम्पत्यापुढे अडचणींचा डोंगर कायम असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Edited by – Sattar Shaikh