जामखेड टाइम्स वृत्तसेवा : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहमदनगर समाजकल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम केलं जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरूवात आजपासून श्रीरामपूर येथून करण्यात आली. रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या अहमदनगर सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने जन शिक्षण संस्थानच्या सहकार्याने ओळखपत्र प्राप्त तृतीयपंथीयांसाठी शेळीपालन प्रशिक्षण कार्यशाळेचे आज,२० जूलै रोजी श्रीरामपूर येथे उद्घाटन करण्यात आले. श्रीरामपूर येथील तृतीयपंथीय समाज आश्रम येथे २३ जूलै पर्यंत ही प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न होणार आहे.
या कार्यशाळा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नुरजहा शेख होत्या. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे दिग्विजय जामदार, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, तलाठी राजेश घोरपडे, जन शिक्षण संस्थानाचे संचालक बाळासाहेब पवार, डॉ. एम. डी. गोसावी, श्रीमती पिंकी शेख, दिशा शेख सह आदी उपस्थित होते.
यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे म्हणाले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून तृतीयपंथीय व्यक्तींसाठी ट्रान्सजेंडर हे राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर नोंदणी केलेल्या तृतीयपंथीयांना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येते.
अशा ओळखपत्र प्राप्त तृतीयपंथीय व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी विविध शासकीय योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. तेव्हा शासकीय योजना, उपक्रम व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी तृतीयपंथीयांनी ‘ट्रान्सजेंडर’ नॅशनल पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन देवढे यांनी केले.
प्रशिक्षण कुशलतेने पूर्ण करून भविष्यात त्याचा आत्मनिर्भर बनण्यासाठी उपयोग करून घ्यावा. यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य समाज कल्याण विभागाकडून केले जाईल. अशा शब्दांत श्री.देवढे यांनी उपस्थित तृतीयपंथीयांना आश्वासत केले. नायब तहसीलदार श्री.वाघचौरे यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत तृतीयपंथीयांना माहिती दिली. यावेळी स्वच्छता पंधारवाडाच्या निमित्ताने उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.