जामखेड टाइम्स वृत्तसेवा । परतीच्या पावसाने जामखेड शेजारील आष्टी तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली आहेत. हातातोंडाशी आलेल्या घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. यामुळे दिवाळी पुर्वीच बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यातून समोर आली आहे.
आष्टी तालुक्यात परतीच्या मोठा धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. काढणीचा आलेले पिके पाण्यात गेली आहे. काही पिके सडली आहेत तर काहींना कोंब फुटले आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आष्टी तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीचा पांढरी गावाला सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीला वैतागलेल्या एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना घडली आहे.
पांढरी गावाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. याच गावातील शेतकरी दादासाहेब बाबुराव वांढरे या 55 वर्षीय शेतकऱ्याने अतिवृष्टीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वांढरे यांनी आपल्या शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी घडली.
मयत दादासाहेब वांढरे हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे अवघी तीन चार एकर शेती होती. अतिवृष्टीमुळे शेतातील पिके भुईसपाट झाली होती. अतिवृष्टीला वैतागून वांढरे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे आष्टी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मयत दादासाहेब वांढरे यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली आणि पत्नी असा परिवार आहे. मयत वांढरे यांच्या आत्महत्येमुळे पांढरी गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपात हंगाम पाण्यात गेला आहे. प्रशासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी मदत जाहीर करणार याचीच प्रतिक्षा आहे.