GBS Death Pune Solapur : जीबीएस आजाराने घेतला राज्यातील पहिला बळी, पुण्याच्या ४० वर्षीय रूग्णाचा सोलापुरात मृत्यू !
GBS Death Pune Solapur : गेल्या आठवडाभरापासून पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराचा (gulen bury syndrome in marathi) मोठा उद्रेक झाला आहे.अश्यातच रविवारी एक धक्कादायक बातमी समोर आली.जीबीएस या आजाराने राज्यातील पहिला बळी घेतला.पुण्यातील एका ४० वर्षीय रूग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे. (gbs outbreak in pune)

जीबीएस (GBS) आजाराने गेल्या आठवडा भरापासून पुणेकरांची झोप उडवून दिली आहे. जीबीएस आजाराच्या रूग्ण संख्येत पुण्यात मोठी वाढ झाली आहे. या आजाराचे १०१ रूग्ण पुण्यात उपचार घेत आहेत.सोलापूरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या पुण्यातील एका तरूणाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. या रूग्णाचे शवविच्छेदन चार डाॅक्टरांच्या पथकाकडून करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मयत रूग्णाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे.(gbs patients death solapur )
समोर आलेल्या माहितीनुसार, मरण पावलेला रुग्ण 40 वर्षांचा होता. त्याला पुण्यात असतानाच जीबीएसची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनास त्रास होत असल्याने या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला या रुग्णाला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्याला साध्या रुममध्ये हलवण्यात आलेलं. मात्र अचानक शनिवारी (25 जानेवारी रोजी) त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. (Gbs outbreak in maharashtra)
मृत व्यक्तीला पुण्यात जीबीएसची लागण झाली होती अशी माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या रुग्णाचा व्हीसेरा देखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या रुग्णाचा मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतीत प्राथमिक माहिती ही शवविच्छेदन आणि व्हीसेरा तपासणी अहवाला नंतरच प्राप्त होईल. मात्र जीबीएसबाबतीत कोणीही अफवा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सोलापूर पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
पुण्यात सर्वाधिक रुग्ण; विशेष उपाय योजना
पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गिया बर्रे सिंड्रोमवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी रुग्णालयामध्ये 50 बेड आरक्षित करण्यात आले असून 15 आयसीयू बेडही कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत. जीबीएस गुइलेन बॅरी सिंड्रोमचे पुण्यात 101 रुग्ण आहेत. त्यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण 5 रुग्णांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे अशी माहिती, पुणे पालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
ज्या खाजगी रुग्णालयात जीबीएसचे रुग्ण आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. नवले हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिल किती घेतात यावर हे अधिकारी नजर ठेवणार आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव, किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे, असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं.
‘जीबीएस’ची लक्षणे काय?
गुइलेन बॅरी सिंड्रोम हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. जाणून घ्या या आजाराची लक्षणे
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
- स्नायु कमकुवत होतात.
- हात, पायात मुंग्या येतात.
- अशक्तपणा जाणवू लागतो.
- बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं.
- धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणं.
यातील कोणतीही लक्षण जाणवल्यास लगेचचं जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक का झाला ?
पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक झाल्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे रूग्णांचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणू आणि नोरोव्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत हे निष्पन्न झाले आहे. दूषित अन्न व पाण्यातून हे जीवाणू आणि विषाणू पसरतात. पुण्यातील रुग्णांना बाधा यामुळेच झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे काही रुग्णांचे शौच व रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. संस्थेने या रुग्णांच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला पाठविला आहे. त्यात काही रुग्णांना कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि काही रुग्णांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग आढळून आला आहे. या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. याचबरोबर या दोन्हीची लक्षणेही पोटदुखी, उलट्या आणि जुलाबही आहेत.
जीवाणू अथवा विषाणू संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यांना १ ते ३ आठवड्यांनी गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो. हा चेतासंस्थेशी निगडित विकार असून त्यात शरीरातील प्रतिकारशक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो. हातापायाला मुंग्या येणे अथवा ते बधीर पडणे अशी लक्षणे दिसून येतात. रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात. त्यात आयव्हीआयजी इंडेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात. या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो.
कॅम्पायलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग कशामुळे होतो?
कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो. दरवर्षी जगभरात १० पैकी एका व्यक्तीला हा संसर्ग होतो. त्यात ५ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक दिसून येते. या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण २ ते ५ दिवसांत बरा होतो. मात्र, काही रुग्णांमध्ये नंतर गुइलेन बॅरे सिंड्रोमची बाधा होते.
नोरोव्हायरसचा संसर्ग कशामुळे होतो?
जीबीएस रुग्णांमध्ये नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे. दरवर्षी जगभरात ६८ कोटींहून अधिक जणांना याचा संसर्ग होतो आणि त्यामुळे वर्षाला सुमारे २ लाख जणांचा मृत्यू होतो. हा विषाणू दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरत असला तरी तो हवेतूनही त्याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. बाधित रुग्णाने उलटी केल्यास त्यातून हा विषाणू हवेत पसरून इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण १ ते ३ दिवसांत बरा होतो. काही रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढत जाऊन गुइलेन बॅरे सिंड्रोम होतो.