GBS Outbreak In Maharashtra : महाराष्ट्रात जीबीएस आजाराचा उद्रेक, पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपुरात जीबीएस आजाराने काढले डोके वर
GBS Outbreak In Maharashtra : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका व ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडवून देणाऱ्या गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात (जीबीएस) (Guillain-Barré Syndrome) आजाराचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकिकडे या आजाराने पुणेकर हैराण झालेले असतानाच आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात या आजारा डोके वर काढले आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपुरात जीबीएस आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात जीबीएस आजाराचा उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. ( GBS virus latest news marathi)
कोल्हापुरात जीबीएस या आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यात एक १२ वर्षाची मुलगी आहे. ती मुळची झारखंड असून तिचे कुटुंबीय कामानिमित्त हुपरीत वास्तव्यास आहेत. तर कोगनोळी येथील ६० वर्षाचा व्यक्ती जीबीएस बाधित आढळून आला आहे. या दोघांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जीबीएस हा कोरोनासारखा आजार नाही. यातून लोक बरे होतात. त्याची भीती बाळगू नये, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी केले. उपचाराला उशीर झाल्याने सोलापुरातील रुग्णाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा आजार संसर्गजन्य आजार नाही. स्वच्छ पाण्याचा वापर, पाणी उकळून पिणे या उपाययोजनांमुळे जीबीएस आजारापासून दूर राहू शकतो. या आजाराचे अस्तित्व पुर्वीपासून आहे. हा आजार आता आलेला नाही, असे मंत्री आबिटकर म्हणाले. खासगी रुग्णालयांनी जीबीएस रुग्णांकडून अधिकचे पैसे घेऊ नयेत, असेही त्यांनी नमूद केले.
जानेवारी महिन्यात कोल्हापूर मधील सीपीआर रुग्णालयात दोन रूग्ण दाखल झाले आहेत. बालरोग विभागात एक बारा वर्षाची मुलगी दाखल आहे. ती झारखंडची असून तिचे घरचे कामानिमित्त हुपरी इथे वास्तव्यास आहेत.दुसरा रुग्ण बेळगाव येथील असून त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. या आजारात मृत्यूचे प्रमाण जास्त नाही.शंभरमधल्या एकाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे प्रमाण आहे. रुग्ण वाढले तर सीपीआर रुग्णालयात ७० व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था उपलब्ध आहे, अशी माहिती सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली आहे.
नागपूरमध्ये जीबीएसची ४ रुग्णांना लागण झाली असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
रविवारी (दि. २६) या आजाराने राज्यात पहिला बळी सोलापुरात घेतला. सोलापूरमध्ये उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रवीण कल्लप्पा विभुते (वय ४०, रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. (GBS Outbreak in Maharashtra)
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन
दरम्यान, पुणे शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ व्हायरचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागीय आयुक्त, पुणे कार्यालयात आढावा बैठक घेतली. ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी आणि शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे आदी सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले आहेत.तसेच आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही आबिटकर यांनी केले आहे.
प्रामुख्याने हे रुग्ण आढळलेल्या भागातील पाण्यांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होत असून एकदम थोड्या रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाऊ नये, याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी.
पुण्यात या आजाराचे १११ आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदेडसिटी, धायरी, आंबेगाव या पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तर काही रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि इतर जिल्ह्यातील असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
Guillain-Barre Syndrome | गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) ही एक दुर्मिळ आजार आहे. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती पेरीफेरल नसावर हल्ला करते. याची सर्व वयोगटातील लोकांना लागण होऊ शकते. पण प्रौढ व्यक्तींना याची लागण होणे हे अधिक सामान्य आहे. बहुतांश लोक या सिंड्रोमच्या सर्वात गंभीर परिस्थितीतून पूर्णपणे बरे होतात. या सिंड्रोममुळे गंभीर आजारी होण्याचे प्रमाण फार दुर्मिळ आहे. पण यामुळे संपूर्ण अर्धांगवायू आणि श्वसनाशी समस्या उद्भवू शकतात. काही परिस्थितीत गुलेन बॅरी सिंड्रोम जीवघेणाही ठरू शकतो. या आजाराने बाधित रुग्णांनी शक्य तितक्या लवकर उपचार घ्यायला हवेत. काही रुग्णांना अतिदक्षता उपचाराची गरज भासू शकते.
हा सिंड्रोम स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम करु शकतो. यामुळे स्नायूची ताकद कमी होऊ अशक्तपणा जाणवू शकतो. पाय आणि हातांमध्ये संवेदना कमी होऊ शकते. तसेच गिळताना अथवा श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
जीबीएस आजाराचे लक्षणे काय?
याची लक्षणे काही आठवडे राहू शकतात.
बहुतांश लोक दीर्घकालीन आणि गंभीर न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीशिवाय बरेही होतात.
यामुळे अशक्तपणा येतो. पायांपासून ते हात आणि चेहऱ्यावर त्याचा परिणाम जाणवतो.
काही लोकांना अर्धांगवायू होऊ शकतो.
या सिंड्रोममुळे एक तृतीयांश लोकांमध्ये छातीच्या स्नायूंवर परिणाम होतो. यामुळे श्वास घेणे कठीण होते.