Ghazal Writer Nitin Deshmukh’s letter to Chhatrapati Shivaji Maharaj : गजलकार नितिन देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराजांस पत्र, पत्राची राज्यभर जोरदार चर्चा !

Ghazal Writer Nitin Deshmukh’s letter to Chhatrapati Shivaji Maharaj : अमरावतीचे प्रसिध्द गजलकार नितीन देशमुख यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना एक पत्र लिहीले आहे. या पत्रातून देशमुख यांनी महाराष्ट्राची आजची धगधगती परिस्थिती महाराजांपूढे मांडली आहे.

महाराजांस पत्र
प्रति,

श्रीमंतयोगी, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज साहेब…

सप्रेम मानाचा मुजरा…

राजे, बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं, सांगायचं होतं आपल्याला.

मनात दाटलेलं, असंख्य विचारांचं काहूर जगू देत नाही शांततेनं,

तुमच्या पवित्र चरणावर करायचा होता आसवांचा अभिषेक…

जिवापाड कष्ट सहन करून तुम्ही निर्माण केलंत रयतेचं राज्य.

राजकारण करतानाही धक्का लागू दिला नाही माणुसकीच्या मूळ मूल्यांना.अबाधित रहावं सामान्यांचं सुख, सुरक्षित रहावी राज्यातली शांतता आणि समृद्धी,यासाठी झटलात अहोरात्र.

शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला तर हात लागू दिलाच नाही, पण सोबतच माणसांच्या काळजाचा देठही दुखावला जाणार नाही याचीही घेतली आपण प्रामाणिक काळजी.

परंतु आज मात्र देश जळतोय.

राजे द्वेष धर्मांधतेच्या विषारी जातीयतेच्या अग्निकुंडात रात्रंदिवस.

रयत गोंधळी, हवालदिल झाली. विविध विचारांच्या सततच्या आक्रमणाने,

रयतेला सुखी करण्यासाठीची तानाजी, मुरारबाजी, बाजी, हिरोजी, नेताजी, हंबीरराव, शिवा काशिदांची निष्ठा. पार हरवली राजे, सतत केली जातेय विषारी बियांची पेरणी,

काय तर केवळ राजकारणाची शेती पिकावी म्हणून.

परंतु या झाडांना शेवटी लागतील विषाचीच फळं ना राजे. जी बेचिराख करतील माणसाचं जीवन.

तुमचा खरा विचार जरासा जरी कुणाला सांगायला गेलं ना… तर अंगावर येतात माणसं.

कारण त्यांना हवा आहे त्यांच्या सोईनुसार त्यांना परवडेल असा शिवाजी व काढलेला अर्थ…

कुणी व कसं सांगावं यांना राजे, की भगव्याला कुठलीच नव्हती जात.

ते होते रयतेच्या कल्याणाचे निशाण. हेच कसं कळत नाही आज मावळ्यांना.

सह्याद्रीच्या कडेकपारी, गडांचे बुरूज तुमच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेल्या पायवाटा, खूप अस्वस्थ झाल्यात आज.

राजे, शिवनेरीवर उगवलेल्या सूर्याचा लखलखता समानतेचा, समतेचा प्रकाश वर्तमानातील माणसांचे काळीज पुन्हा सत्याने भारावून टाकेल काय हो..?

खरं तर लेकरं तुमचीच आहेत… अजूनही चांगलीच आहेत. परंतु थोडी वाट चुकलीय. नको त्या विचारांच्या हल्ल्यांनी महाराष्ट्राच्या मनाचा गड काबीज केलाय राजे.

आजची लढाई अजूनच कठीण झालीय कारण शत्रूला चेहराच नाही. वार कसा करायचा?

हा बिनचेहऱ्याचा शत्रू पार वाट लावेल तुमच्या अस्सल सोनेरी मानवतेच्या शिकवणीची.

आपलीच माणसं आपल्याच माणसांना शत्रू समजायला लागली आहेत…

राजे बाकी इकडे शेती फार पिकली नाही. शेतमालाला भाव नाही. नद्या आटल्यात. कधी दुष्काळ तर कधी महापूर…..

मनाचे झरेपण अडवलेत, सडलेत भरभक्कम अडसरांनी.

जो संपायला हवा होता आजपावतर तो अधिकच गडद होत चाललाय जातींचा रंग.

तुम्ही लढलात केवळ वाईट प्रवृत्तींसोबत, रयत सुखी व्हावी म्हणून. परंतु हे कसं कळत नाही आम्हाला.

माँसाहेबांचा स्वराज्य स्थापनेचा शुद्ध विचार मोजतोय अखेरच्या घटका.

त्यांच्या पारदर्शी भावनेचा चुकीचा अर्थ काढून आम्ही शेकतोय आपापल्या पोळ्या आपापल्या स्वतंत्र चुलींवर.

राजे, बघा ना. हुंदके देऊन देऊन रडतोय रायगडाचा दगड अन् दगड.

सर्वच जातीजमातींच्या घामानं रक्तानं उभं राहिलेलं रयतेचं स्वराज्य आज हवालदिल झालीय राजे.

रयतेच्या दुःखाची जाणीव ठेवणाऱ्या राजाच्या राज्यात सर्वत्र माजलेत शोषणाचे तीक्ष्ण दात घेऊन फिरणारे कोल्हे, लांडगे, क्षणाक्षणाला लचका तोडतायत मानवतेचा, स्वराज्याच्या मूळ मूल्यांचा.

आम्ही खूप डिजिटल वगैरेपण झालोत राजे. परंतु विसरलोत पार. रयतेच्या सुखासाठी जगणे. आमच्यासाठी मोठं झालंय सिंहासन रयतेपेक्षा.

काहीच लिहू नये, कुणालाच काही सांगू नये,पाहत रहावं तुमच्या तेजस्वी चेहऱ्याकडे एकसारखं आतून रडत. कुणी काही ऐकत नाही. केवळ वरवरच्या पोकळ विचारांना सत्य मानून त्या तकलादू विचारधारेसाठी एकमेकांचा जीव घ्यायला उठली आहे तुमची रयत.

संकुचित विचारांचे पत्थर लावून. सर्वत्र दुष्काळ पसरलाय राजे. कुठेच ओलावा नाही. भरवसा हरवला. प्रेम, कारुण्य गहाण पडलेत व्यवस्थेच्या दुकानात. सगळा राडा चाललाय. बरं, या सर्वांचा फार फायदा फार कुणालाच नाही…

तात्पुरतं राजकीय समीकरणं जुळवणे बस् एवढाच; परंतु अखिल महाराष्ट्राला भोगावी लागेल याची चिरकाल फळ हे अजूनही कळत नाहीय आम्हास.

यांना कळतच नाही इथल्या मातीत आहे जर शिवाजी इथला प्रत्येक बंदा तर शिवाजी तू नको वाऱ्यास बांधू चौकटांनी..

जात-पाती-पंथ यांच्यावर शिवाजी. बाकी सर्व काही कुशल मंगल नाही. तुम्ही कसे आहा रायगडावर… मजेत ना.

पण नसणार तुम्हीही मजेत. अतीव दुःख आणि रागपण असेलच तुमच्या मनात आमच्याविषयी. रास्तच आहे. तुमची लेकरं पार रस्ता चुकलीत ना राजे.

रायगडाच्या मातीवरून उठणाऱ्या वायूलहरीच दुरुस्त करू शकतील बिघडलेल्या मनांना. पण त्यासाठी निदान काळजाची दारं तर उघडी हवीत ना आमची ?

असो. राजे, तुमचा खूप वेळ घेतला. तसदीबद्दल क्षमा असावी.

पण तुमच्याशिवाय मन मोकळं करावं तरी कुठे? बहुत जनासी आधारू, तुम्हीच ना..!

खूप वाढलाय पत्रप्रपंच थांबतो… उत्तर जरूर द्या. राज्याभिषेक सोहळ्याला गडावर आलो की बोलूच.

माँसाहेबांना मानाचा मुजरा. शंभूराजांना नमन करतो. थांबतो राजे… जगदंब!!

आपला

नितीन देशमुख (9823794240)
चांदुरबाजार, आमरावती