शेतकऱ्यांसाठी खुशखबर : अखेर 148 दिवसांच्या प्रवासानंतर मान्सून वाऱ्यांनी देश सोडला – हवामान विभागाची घोषणा, यंदा अहमदनगर जिल्ह्यात 197 टक्के अधिक पाऊस झाला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जून ते सप्टेंबर या चार महिन्यात भारतात मान्सून सक्रिय असतो. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मान्सून वारे परतीच्या प्रवासाला निघाले. यंदा आठ दिवस उशिरा मान्सून वारे भारतातून माघारी परतले, 23 ऑक्टोबर रोजी मोसमी वारे भारतातून परत फिरले, अशी घोषणा हवामान विभागाने केली आहे.
यंदा पावसात खंड पडल्यानंतर परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली होती. या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.ऐन सणासुदीला निसर्ग कोपला आणि होत्याचं नव्हतं झालं. खरिप हंगामातील काढणीला आलेली पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली. परतीच्या पावसाने राज्यातील बळीराजाचे कंबरडे मोडले. सध्या राज्यातील नुकसानग्रस्त भागात प्रशासनाकडून पंचनामे आणि मंत्र्यांचे पाहणी दौरे सुरु आहेत.राज्यातील बळीराजा आर्थिक मदतीच्या प्रतिक्षेत आहे.
यंदा परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह देशभर धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 102 टक्के पावसाची नोंद झाली. दिल्लीत सर्वाधिक परतीचा पाऊस झाला. येथे अक्षरशः चौपट पाऊस झाला. महाराष्ट्रातील 90 टक्के भागात सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली. यामध्ये मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक 133 टक्के पाऊस नोंदवला गेला. अहमदनगर जिल्ह्यात यंदा 197 टक्के अधिक पाऊस झाला.
यंदाच्या पावसाळ्यात जुन ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात 24 टक्के अधिक पाऊस पडला होता. त्यात जून आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने मात्र चित्रच बदलून टाकले. विजांच्या कडकडाटसह पडणाऱ्या परतीच्या धो धो पावसाने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मोठा धुमाकूळ घातला. यात शेतीचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा 102 टक्के अधिक पाऊस झाला. तसेच मुंबई उपनगरांमध्ये 194 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. तसेच महाराष्ट्रातील ठाणे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, पुणे, नाशिक,धुळे, जळगाव, सातारा, नागपुर, गोंदिया, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला.
उत्तर भारतातही परतीच्या पावसाने कहर केला. सर्वाधिक पाऊस राजधानी दिल्लीत सरासरीपेक्षा 469 टक्के अधिक झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आदी राज्यांतही सरासरीपेक्षा 300 ते 400 टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली. राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागांतही सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. एक ऑक्टोबरपासून देशात सरासरीपेक्षा 65 टक्के अधिक पाऊस झाला.
देशात यंदा 29 मे रोजी केरळमार्गे र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी प्रवेश केला होता. 10 जूनला ते तळकोकणमार्गे महाराष्ट्रात सक्रिय झाले. 15 ऑक्टोबपर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर उत्तरेकडे प्रवास करीत मोसमी वारे 02 जुलैला देशव्यापी झाले होते. त्यानंतर 20 सप्टेंबरला राजस्थानच्या काही भागांतून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.
भारताच्या विविध भागांतून परत फिरत मोसमी वारे 14 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला निघाले. त्यानंतर 23 ऑक्टोबरला संपर्ण महाराष्ट्रासह देशातून ते माघारी गेले. यंदा देशातील हा त्यांचा प्रवास 148 दिवसांचा ठरला. मोसमी वारे नियोजित वेळपेक्षा आठ दिवस उशिरा, पण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत देशातून ते लवकर माघारी गेले. 2021 मध्ये २५ ऑक्टोबर, तर 2020 मध्ये २८ ऑक्टोबरला मोसमी वारे देशातून माघारी गेले होते.