गुड न्यूज : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून यलो-ऑरेंज अलर्ट जारी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा | राज्यात मान्सून दाखल होऊन महिना उलटला तरी राज्याच्या अनेक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत होता.पावसाअभावी अनेक भागात पेरण्या झालेल्या नाहीत.दडी मारलेला पाऊस कधी बसणार याकडे सर्वांचेच लक्ष आभाळाकडे लागले होते. मात्र आता हवामान विभागाकडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील सर्वच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात धोधो पाऊस पडून नदी नाले वाहते होतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या दीड महिन्यापासून जामखेड तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्यातील खरिप हंगामातील पेरण्या रखडल्या. ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलीवर पेरण्या केल्या होत्या त्यांची पिके अभावी माना टाकू लागले होते. बळीराजा देवाकडे पावसासाठी धावा करत होता. मात्र आज दुपारपासून जामखेड तालुक्यातील अनेक भागात पाऊस सक्रिय झाला आहे. अकाशात ढगांची दाटी वाढली आहे. जामखेड तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जामखेड तालुक्याला दमदार पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे.
18 जूलै ते 21 जूलै या पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. महाराष्ट्रात आज मुंबई, ठाणे, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक भाग, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तेलंगणात अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.