खुशखबर : अहमदनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून जाणार पुणे – अहमदनगर- संभाजीनगर (औरंगाबाद) एक्स्प्रेस वे, भूसंपादनाआधीची प्रक्रिया झाली सुरू
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमांतून देशभरात नॅशनल हायवेचे जाळे मोठ्या वेगाने विस्तारत आहे. नव्या मार्गांच्या निर्मितीमुळे देशातील अनेक मोठ्या शहरांमधील अंतर कमी झाले आहे. यातून दळणवळणाची सुविधा वेगाने विस्तारीत झाली आहे. आता पुणे आणि औरंगाबाद या महत्वाच्या औद्योगिक शहरांना जोडणारा नवा एक्स्प्रेस वे साकारण्याचा निर्णय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे दोन्ही शहरांमध्ये अधिक जलद गतीने पोहचता येणार आहे. या एक्स्प्रेस वे चा मोठा फायदा अहमदनगर जिल्ह्याला होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या तीन राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत, आता पुणे-अहमदनगर-संभाजीनगर (औरंगाबाद) हा चौथा महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे. 100 मीटर रूंदीचा हा महामार्ग दहा पदरी असणार आहे. या महामार्गामुळे अहमदनगर ते पुणे हे अंतर अवघ्या 70 ते 75 मिनिटांत सहजपणे पार करता येणार आहे. हा मार्ग अहमदनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून जाणार आहे.या एक्स्प्रेस वे साठी भूसंपादनाआधीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) – अहमदनगर – पुणे या एक्स्प्रेस वे साठी अहमदनगर जिल्ह्यातील अंदाजे 1300 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा मार्ग नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर, श्रीगोंदा, पारनेर, या सहा तालुक्यातून जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे एकुण 270 किलोमीटरचा आहे. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील अंतर 124 किलोमीटर असणार आहे. या एक्स्प्रेस वे वर वाहनांचा वेग ताशी 100 ते 120 इतका असणार आहे. या एक्स्प्रेस वे चा भूसंपादन प्रक्रिया पुणे विभागाकडून केली जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या कल्याण – विशाखापट्टणम (निर्मल) या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. तसेच सुरत – हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाची जमीन अधिग्रहण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच मुंबई- नागपुर समृध्दी मार्गावरील नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे काम पुर्ण झाले आहे. अहमदनगर- मनमाड या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली आहे. या मार्गाचे टेंडर निघाले आहे. या मार्गावरील अहमदनगर ते कोपरगाव या 80 किलोमीटरसाठी 800 कोटीची निविदा प्रसिद्ध झाली आहे. तसेच आढळगाव ते जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचेही काम सुरू आहे.