Good news : Vikram Lander Just 25 km from Moon, Chandrayaan-3 is soft landing time has come

मोठी बातमी ! विक्रम लॅंडर चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटर दुर, चांद्रयान-3 च्या साॅफ्ट लँडींगची वेळ ठरली

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारत आणि रशिया या दोन देशांच्या चंद्र मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे ळ. भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर भारताच्या विक्रम लँडरचा प्रवास सुरू आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे रशियाचे लुना 25 या चांद्रयानात तांत्रिक बिघाड झाल्याने चंद्रावर जायच्या मार्गावरून भरकटले आहे.

भारताची चांद्रयान 3 मोहिम महिनाभरापासून सुरू आहे. चांद्रयानचे चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत मार्गक्रमण सुरू होते. टप्या टप्प्याने त्याच्या कक्षा बदलण्यात आल्या. 17 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात यशस्वी मोहिम पार पडली. या मोहिमेत प्रोपप्लशन माॅड्यूलपासून विक्रम लॅंडर वेगळे झाले. विक्रम लॅंडरने एकट्याने चंद्राभोवती प्रवास सुरू केला होता. विक्रम लॅंडर 113 किमी × 157 किमी कक्षेत प्रवास करत होता. आता त्याची कक्षा बदलण्यात आली आहे. 25 किलोमीटर × 134 किलोमीटर कक्षेत विक्रम लॅंडर रेट्रोफिटींग (विरूध्द) दिशेने प्रवास करत आहे.

शनिवारी रात्री विक्रम लॅंडरचे डीबूस्टिंग करण्यात आले. दुसऱ्या आणि अंतिम डीबूस्टिंग ऑपरेशनने यशस्वीरित्या LM कक्षा 25 किमी x 134 किमी पर्यंत कमी केली आहे. विक्रम लॅंडर उंची आणि वेग कमी करत चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर अंतरावर पोहचले आहे. 25 किलोमीटर × 134 किलोमीटर कक्षेत विक्रम लॅंडर प्रवास करत आहे. सध्या विक्रम लॅंडरकडे 150 किलो इंधन शिल्लक असल्याची माहिती, इस्त्रोने जारी केली आहे.

चांद्रयान-3 च्या साॅफ्ट लँडींगची वेळ ठरली

14 जुलै रोजी प्रक्षेपणाच्या वेळी, 1,696.4 किलो इंधन प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये लोड केले गेले होते. दुसरे आणि अंतिम डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि त्याचे लँडर खूप कमी कक्षेत आणले गेले आहे. आता मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त केलेल्या लँडिंग साइटवर सूर्यप्रकाशाची प्रतीक्षा केली जाईल, असे इस्त्रोने ट्विट केले आहे. लँडिंगची वेळ 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.45 वाजता निर्धारित केली आहे.