जवळ्याच्या राजकारणातील पितामह : स्वर्गीय जेष्ठ नेते श्रीरंग कोल्हे

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड बाजार समितीचे माजी सभापती तथा जवळा गावच्या राजकारणातील पितामह श्रीरंग कोल्हे यांचे मंगळवारी नाशिक येथे निधन झाले. मृत्यू समयी ते 86 वर्षांचे होते. जामखेड तालुक्याच्या राजकारणातील जुन्या नेत्यांपैकी कोल्हे हे महत्वाचे नेते होते. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात कोल्हे यांना ‘भाऊ’ या नावाने ओळखले जायचे. जाणून घेऊयात भाऊंच्या कार्याचा धावता आढावा.

स्वर्गीय जेष्ठ नेते श्रीरंग कोल्हे यांचा जन्म 18 जुलै 1935 सालचा. कोल्हे यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात इंदिरा काँग्रेसमधून केली. काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता म्हणून त्यांची राजकीय पटावर ओळख होती. अतिशय संयमी राजकारणी म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या शब्दाला राजकारणात मोठे वजन होते. जवळा गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेले भरीव प्रयत्न जवळा गावाला नवीन ओळख मिळवून देणारे ठरले. जामखेड तालुक्याच्या राजकारणात कोल्हे यांनी सहकारमहर्षी गोपाळराव सोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राजकारण केले. ते अहमदनगर जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थेचे ते 1979 ते 1989 अशी दहा वर्षे संचालक होते त्यापैकी दोन वर्षे चेअरमन पद भूषवले होते. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी काम केले.

श्रीरंग कोल्हे यांनी ग्रामपंचायत आणि सेवा सोसायटीच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी दोन्ही संस्थांवर जबरदस्त पकड ठेवली होती. याच जोरावर कोल्हे हे सलग 11 वर्षे जामखेड बाजार समितीचे सभापती होते.सहकारमहर्षी गोपाळराव सोले पाटील यांचा राजकीय आशीर्वाद कोल्हे यांना लाभला होता.

श्रीरंग कोल्हे अर्थात भाऊंनी जवळा गावच्या राजकारणात बजावलेली भूमिका खूप मोलाची आहे. त्यांनी तब्बल 25 वर्षे गावचे सरपंचपद  भूषवले तर 5 वर्षे उपसरपंचपद भूषवले. ग्रामपंचायतीच्या राजकारणात प्रदिर्घकाळ गावचे सत्ता भोगणाऱ्या मोजक्याच नेत्यांमध्ये त्यांची अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात गणना होते.

Grandfather lost in politics: Senior leader Shrirang Kolhe passes away

जवळा हे गाव तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे गाव आहे. जवळा जिल्हा परिषद गटात जवळा गाव ज्या पक्षाकडे झुकते त्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो हा इतिहास कोल्हे यांच्या राजकीय खेळ्यांमुळे निर्माण झाला होता. कोल्हे यांनी जवळा सेवा संस्थेच्या 70 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 40 वर्षाहून अधिक काळ तर  जवळा ग्रामपंचायतीच्या 60 वर्षाच्या कार्यकाळात 40 वर्षाहून अधिक काळ एकहाती वर्चस्व कायम ठेवले होते.

दरम्यान तालुक्याच्या बदलत्या राजकारणात कोल्हे यांना मोठ्या संधी देण्यात अनेक पक्ष कमी पडले. तालुक्याचे नेतृत्व करण्याची धमक असतानाही अनेकदा त्यांना डावलण्यात आले परंतु अश्याही काळात त्यांनी संयम ढळू न देता राजकीय उपद्रवमूल्य दाखवून दिले नाही. परंतु बदलत्या राजकारणात त्यांनी मागील 15 वर्षात माजी मंत्री राम शिंदे यांना राजकीय आशिर्वाद देण्याची सातत्याने भूमिका घेतली. यातून शिंदे यांना मोठा राजकीय फायदा झाला. जेष्ठ मार्गदर्शक म्हणून कोल्हे यांना शिंदे यांनी सतत आदरस्थानी ठेवले. त्यांचा सन्मान राखला. कोल्हे यांच्या शब्दाला शिंदे यांच्याकडे मोठी किंमत होती.कोल्हे यांनी टाकलेला शब्द शिंदे यांनी कधीच खाली पडू दिला नाही.

 

स्वर्गीय भाऊंना जामखेड टाईम्स परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली !