Hassan Mushrif big announcement | किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांची मोठी घोषणा !
मुश्रीफांचा रोख चंद्रकांत पाटलांसह समरजीत घाटगेंवर
कोल्हापूर । भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचाच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लागलीच पत्रकार परिषद घेत सोमय्यांच्या आरोपांचे खंडन करत किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याची घोषणा केली. (Hassan Mushrif big announcement after Kirit Somaiya’s allegation)
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी थोड्याच वेळापूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांविरोधात आरोप करत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. व सोमय्यांच्या आरोपांचे खंडन केले. तसेच सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचेही स्पष्ट केले. किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. आणि यामागे चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगेच असतील, असा आरोप देखील यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती असेही मुश्रीफ म्हणाले.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत घेतल्यानंतर लगेचच तातडीची पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिल आहे. किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला.
किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.
सोमय्या यांनी काय आरोप केले?
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे .राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत.
बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे.