महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट, ‘या’ भागाला हवामान विभागाकडून येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात सर्वदुर मान्सूनचे आगमन कधी होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे मान्सबाबत वर्तविण्यात आलेले अंदाज फोल ठरले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले आहे. महाराष्ट्रात येत्या चार ते पाच उष्णतेची सक्रीय होणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेचे प्रमुख शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
बिपरजाॅय चक्रीवादळामुळे देशाच्या हवामानावर परिणाम झाला आहे. काही भागात ऊन तर काही भागात पाऊस अशी स्थिती या चक्रीवादळामुळे तयारी आहे. याचा फटका महाराष्ट्राला पुढील चार ते पाच दिवस बसणार आहे. विदर्भातील सर्वच भागात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट सक्रीय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे.विदर्भात उष्ण लहरी ते तीव्र उष्ण लहरी असे वातावरण राहणार आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विदर्भात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट सक्रीय राहणार असली तरी मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे.
रत्नागिरीत मुक्कामी असलेला मान्सून महाराष्ट्रात 25 जून नंतर सक्रिय होऊ शकतो. दक्षिण आणि ईशान्य भारतात येत्या 18 ते 21 जून या काळात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होत असल्याने बळीराजाला चिंता वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी जोवर समाधानकारक, पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोवर पेरण्या करू नये, असे अवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.