गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात वर्गणी गोळा करण्यासाठी ‘धर्मादाय’ विभागाकडून ऑनलाईन परवानगी कशी मिळवायची ? जाणून घ्या सविस्तर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव’ च्या विविध उपक्रम व कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ (क) अन्वये सन २०१६ पासून धर्मादाय उप आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या कार्यालयाकडून ऑनलाईन परवानगी मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा नेमका कसा वापर करायचा ? चला तर मग जाणून घेऊयात.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव’ च्या विविध उपक्रम व कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ (क) अन्वये परवानगी मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज व माहिती संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे.
माहिती भरताना संकेतस्थळाच्या होमपेज (मुख्य पृष्ठ) वरील प्रणाली मार्गदर्शनमध्ये ३१ (क) परवानगीबाबतची सविस्तर माहिती वाचून ऑनलाईन अर्ज दाखल करावा.
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याबाबतची माहिती सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अहमदनगर यांचे कार्यालयाच्या नोटीसबोर्डावर लावण्यात आलेली आहे.
ऑनलाईन माहिती भरताना कोणते कागदपत्रे आवश्यक असतात ?
1) सर्व सदस्यांचा स्वाक्षरी केलेला हस्तलिखीत ठराव असावा.
2) पदाधिकाऱ्यांचे/ सदस्यांचे ओळखपत्रांची स्कॅन केलेली प्रत जोडावी. (फोटो आयडीची प्रत ओळख पटण्याजोगी असावी)
3) उत्सवाच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकतपत्र/ परवानगी पत्र जोडावे.
4) नगरसेवक / प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे मंडळ सदस्यांचे ओळखीबाबत पत्र जोडावे.
5) मागील वर्षांच्या उत्सवाचे हिशोब (लेखा परिक्षण अहवाल) जोडावे.
6) मागील वर्षी घेतलेल्या परवानगीची प्रमाणीत प्रत जोडावी.
वरिल बाबींची परिपूर्ण पूर्तता केलेला अर्ज प्राप्त झाल्यानंतर धर्मादाय उप आयुक्त/सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांना योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर, त्यास योग्य अशा शर्तीस अधीन राहून अशी देणगी/वर्गणी गोळा करणेस परवानगी देण्यांत येईल.
ऑनलाईन अर्ज केल्यास सदर ऑनलाईन परवानगी अर्जदाराच्या ई-मेलवर पाठविण्यांत येईल. परवानगी न घेता वर्गणी/देणगी गोळा केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची सर्व मंडळ तथा पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी.
कार्यालयात समक्ष येऊन विहीत नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे दाखल करण्याची सुविधा ही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी यांच्याशी 0241-2356400 वर संपर्क साधावा. असे आवाहन ही धर्मादाय उपआयुक्त, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.