Ashutosh Kale News : याचिका मागे घ्या नाही तर ईडी मागे लावेन, अहमदनगर जिल्ह्यातील आमदाराच्या धमकीने उडाली खळबळ
Ashutosh Kale News : सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांना धमकी दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याचिका मागे घ्या, नाहीतर इडी मागे लावेन अशी त्यांनी धमकी दिल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला आहे. अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी दबावतंत्र वापरल्याने खळबळ उडाली आहे.
न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीने 2021 साली साईमंदिर विश्वस्त आणी अध्यक्षांची निवड केली होती. मात्र या निवडीला हायकोर्टाने स्थगिती दिल्याने तात्कालिन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह विश्वस्तांनी सुप्रिम कोर्टात तीन याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. या प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता अजित पवारांसोबत सत्तेत सामील झालेल्या आमदार आशुतोष काळे यांनीच विश्वस्तांना फोनवरून धमकावत याचिका मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विश्वस्त सुहास आहेर , सचिन गुजर, अविनाश दंडवते यांना फोन करत याचीका मागे घेण्यासाठी दबाव टाकत धमकी दिल्याचा विश्वस्तांनी आरोप केला आहे. सरकारमधून याचिका मागे घेण्याचा दबाव येत असल्याचं सांगत याचिका मागे घेतली नाही तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल. तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले जाईल. तुमच्या मागे हात धुवुन लागू या प्रकारे आशुतोष काळे यांनी धमकावल्याचा खळबळजनक आरोप विश्वस्तांनी केला आहे.
या आरोपाबाबत आमदार आशुतोष काळे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समजू शकली नाही. आमदार काळे या आरोपांवर काय पलटवार करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.