Nagar : जिल्ह्यात फक्त या 15 दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरता येणार, जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगीचे आदेश जारी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत सन २०२५ मधील पुढील नमूद १५ दिवसांसाठी ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेशाद्वारे परवानगी दिली आहे.

१९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती (तारखेनुसार शासकीय), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ ऑगस्ट, १,२ व ६ सप्टेंबर गणपती उत्सव, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २९ व ३० सप्टेंबर नवरात्र उत्सव, २१ ऑक्टोबर दीपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस, ३१ डिसेंबर २०२५ व उर्वरित दोन दिवस शासनाने विहित केलेल्या अटीच्या अधिन राहून आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात येईल.
उत्सव कालावधीमध्ये ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने निश्चित केलेल्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करावे. तसेच ध्वनी प्रदूषण नियम २००० अंतर्गत स्थापन केलेल्या प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त तक्रारींवर उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करावी.
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतता क्षेत्राची माहिती घेऊन त्या भागाातील ध्वनिमापक संयंत्राद्वारे ध्वनिचे कंट्रोल नमुने घ्यावेत. त्याबाबत पंचनामा व ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद घ्यावी.
एखाद्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन आजुबाजुच्या लोकांना व सर्वसामान्यांना त्रास होत आहे अशी तक्रार आल्यास ती लिहून घ्यावी व स्टेशन डायरीला नोंद करुन त्या तक्रारीचा खरे-खोटेपणा पहाण्यासाठी घटनास्थळी जावे.
घटनास्थळी गेल्यावर दोन पंचाच्या समक्ष ध्वनिची तीव्रता किती आहे याची नोंद घ्यावी. घटनास्थळाचे छायाचित्रण करावे. मोजलेली तीव्रता ही मानद मर्यादेपेक्षा अधिक असल्यास उचित प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत.
घटनास्थळी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या अहवालासोबत चौकशीचे सर्व कागदपत्रे त्वरित पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० मधील तरतुदीप्रमाणे निर्माण करण्यात आलेल्या प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत.
वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचार संहितेचा नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.