अंबालिकासह राज्यातील पाच साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार आले अडचणीत ?
मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांवर आयकर विभागानं गुरूवारी सकाळपासून मोठी कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दुजोरा दिला आहे. (Income tax department raids five sugar factories in the state including Ambalika: Deputy Chief Minister Ajit Pawar in trouble? )
आयकर विभागाची दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अजित पवार यांच्या नातेवाईकांचीही झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
जरंडेश्वरवर पुन्हा छापा
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागानं छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे चालवण्यासाठी आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. ईडीनं यापूर्वीचं जरंडेश्वर साखर कारखाना यापूर्वी सील केलेला आहे.
छापे पडलेले कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तींयांचे?
आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागानं कारवाई केलेले साखर कारखाने हे अजित पवारांच्या निकटवर्तींयांचे असल्याची माहिती आहे.
बारामतीमध्येही छापे
बारामतीत दोन ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापे टाकले आहेत. हे छापे नेमके ईडी किंवा आयकर विभागाचे आहेत हे अद्याप समजलेले नाही. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की काय माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सलाच माहिती.”
माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?
“माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दुख आहे, ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं.”
खालच्या पातळीवर जाऊन राजकारण
माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचं मला काही नाही, पण नातेवाईकांवर धाड कशी . त्यांचा संबंध नसताना धाड टाकली याचं मला वाईट वाटलं. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण मला पटलेलं नाही. सरकार येत असतं जात असतं, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते. मागे निवडणुकीच्या काळात, पवारसाहेबांचा एका बँकेशी काहीचा संबंध नसताना नोटीस आली, त्यावेळी राजकारण सर्वांनी पाहिलं.
अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयकर विभागाकडून पाच साखर कारखान्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे देखील अनेक कारखाने आहेत, त्यापैकी एकावर पण कारवाई नाही, असं ते म्हणाले आहेत. आधी कारवाई करायची,मीडियात मोठी प्रसिद्ध द्यायची आणि नंतर तो निर्दोष सुटतो, मी या कारवाईचे उत्तम उदाहरण असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे.