जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात हर घर तिरंगा मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाचे सर्वच विभाग प्रचार आणि प्रचार करुन जनजागृती करत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातून जामखेड तालुक्यात देशभक्तीचे वातावरण आहे. हर घर तिरंगा मोहिमेत जामखेड तालुक्यातील 30 हजार घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आज जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.
जामखेड तालुका प्रशासन आणि शहरातील सर्व शाळांच्या सहभागातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आज जामखेड शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या रॅलीत तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, एन सी सी ऑफीसर मयुर भोसले, गौतम केळकर, अनिल देडे, नगरपरिषदचे कर्मचारी प्रमोद टेकाळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देश भरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आसल्याने सर्वंनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. हर घर तिरंगा हा कार्यक्रम सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने हर घर तिरंगा या संकल्पनेतून जामखेड तहसील कार्यालय, जामखेड नगर परिषद, तसेच सर्व विभागाचे प्रशासकीय प्रमुख, सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी अहमदनगर, ल. ना होशिंग विद्यालय, कन्या विद्यालय, श्री नागेश विद्यालय, व जामखेड महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने जामखेड शहरात आज दि १२ रोजी प्रभात फेर चे आयोजन करण्यात आले होते.
जामखेड नगरपरिषदेने तिरंगा रथाची सजावट केली होती.१५० एनसीसी कॅडेटने अतिशय थाटामाटात तिरंगा ध्वजाचे संचलन केले.यावेळी संपूर्ण जामखेड शहर भारत माता की जय, हर घर तिरंगा, देश की शान तिरंगा, हमारी जान तिरंगा , वंदे मातरम या घोषणेने दुमदुमून निघाले होते. नागरिकांनी या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला.
ही रॅली कोर्ट रोड, मेन पेठ, संविधान चौक, खर्डा रोड, जयहिंद चौक, बीड कॉर्नर मार्गे जामखेड तहसील कार्यालयासमोर येऊन सदर रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.