जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या जामखेड शहरातील राजकीय नेत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या (Municipal Council Election) निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे.
जामखेडसह राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीच्या तारखेची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली.
राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.
आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 पैकी 208 नगरपरिषद आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी शुक्रवारी (10 जून) नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल.
आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.