कर्जत : पाटेगाव ग्रामसभेचे इतिवृत्त.. नकाशा अन् बरचं काही… आमदार राम शिंदेंनी केली रोहित पवारांची पोलखोल !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी मी प्राधान्यक्रमाने सरकारमधला आमदार म्हणून लढणार आहे. कर्जतमध्ये एमआयडीसी आली पाहिजे ही माझ्यासहीत कर्जत जामखेडच्या जनतेची भावना आहे. परंतू कुठल्याही दलालासाठी, कुठल्याही निरव मोदीसाठी, अगरवाल, शहासाठी ही एमआयडी होणार नाही, भूमिपुत्रांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी एमआयडीसी झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे, असे ठणकावून सांगत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला.
जिथे कुठे त्यांना एमआयडीसी करायची होती ती गावकऱ्यांसाठी नाहीये, शेतकऱ्यांसाठी नाहीये, बेरोजगारांसाठी नाहीये, नवतरुणांसाठी नाहीये, ती एमआयडीसी फक्त आणि फक्त निरव मोदी, अग्रवाल, शहा, छेडा, विनोद खन्ना अश्या दलालांच्या जमिनीवरती ही एमआयडीसी आणण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. या दलालांना कोणत्याही परिस्थितीत थारा द्यायचा नाही. अश्याच पध्दतीचं सर्वांचं मत झालेलं आहे, असे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. आमदार राम शिंदे मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पाटेगाव ग्रामसभेचे इतिवृत्त उद्योग मंत्र्यांच्या दरबारी
यावेळी आमदार राम शिंदे यांनी पाटेगाव ग्रामसभेचे इतिवृत्त मीडियासमोर वाचून दाखवले. कर्जत तालुक्यातील जेष्ठ नेते तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट कैलास अण्णा शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसी संदर्भात पाटेगावला विशेष ग्रामसभा झाली. ग्रामसभेने बहुमताने ग्रामसभेला विरोध केला आहे. ग्रामसभेचे इतिवृत्त उद्योग मंत्री यांना पोहोच करावं अशी विनंती पाटेगाव ग्रामस्थांनी केली. त्यामुळे मी पाटेगाव ग्रामसभेचे इतिवृत्त उद्योग-मंत्र्यांना देणार आहे, असेही आमदार राम शिंदे म्हणाले.
यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी पाटेगाव भागात होणाऱ्या नियोजित एमआयडीसीचा नकाशा मीडियासमोर दाखवला निरव मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जागा कुठे आहेत हे मीडियाला दाखवले. निरोप मोदी आणि दलालांचा फायदा व्हावा यासाठी आमदार रोहित पवार कसे प्रयत्न करत आहेत याची पोलखोल त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
कर्जत एमआयडीसीसाठी सरकारमधला आमदार म्हणून मी प्राधान्यक्रमाने लढणार
कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी मला भेटायला मुंबईत आलेले आहेत. मी त्यांना घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांना भेटणार आहे. त्यांनी कर्जत एमआयडीसीचं तीन महिन्यांचं अश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मिटींग करू. पाटेगाव ग्रामसभेचा ठराव मी उद्योगमंत्र्यांना भेटून देणार आहे. कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी मी प्राधान्यक्रमाने सरकारमधला आमदार म्हणून लढणार आहे.कुठल्याही दलालासाठी ही एमआयडी होणार नाही, भूमिपुत्रांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही एमआयडीसी झाली पाहिजे ही भावना घेऊन आम्ही उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांना भेटणार आहोत, असे शिंदे म्हणाले.
चौकशी नंतर कळेल ही एमआयडीसी नेमकी कोणासाठी करायची होती ते
निरव मोदी, शहा, आगरवाल यांचा कर्जत तालुक्यात जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पात त्यांना कोणी पार्टनर आहे का, त्यांना फायदा पोहचवण्यासाठी कोण प्रयत्न करतयं का? असा प्रश्न विचारला असता आमदार राम शिंदे म्हणाले, 2012-2013 मध्ये ज्या वेळेस निरव मोदी आणि त्यांच्या मित्रांनी कर्जत तालुक्यात जागा खरेदी केल्या, सोलर प्रकल्प सुरु केला, तेव्हा तिथल्या लोकांना माहिती आहे की, यांचा पार्टनर कोण आहे आणि तो हिडन आहे.त्यामुळे तो चौकशीत निष्पन्न होईल. त्यानंतर कळेल ही एमआयडीसी नेमकी कोणासाठी करायची होती ते.
याचाच अर्थ निरव मोदींसाठीच त्यांची सगळी खटाटोप
मी केलेल्या आरोपांवरती रोहित पवारांनी खंडन केलंलं नाही. या जमिनी निरव मोदीच्या नाहीत याचं त्यांनी आजतागायत खंडन केलेलं नाही.याचाच अर्थ निरव मोदींसाठीच त्यांची ही सगळी खटाटोप चाललेली होती.असा हल्लाबोल करत आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, पहिल्या एमआयडीसीचा जो प्रस्ताव दिलाय त्याची चौकशी लागलेली आहे. त्या चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते होईलच. पण नव्याने एमआयडीसी करण्यासंदर्भात आम्ही आग्रही आहोत, असेही शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
त्यांचं पितळ उघडं पडलं म्हणूनच नौटंकी सुरुय
आम्ही मुद्याचं बोलतो, त्यांना मुद्याचं बोलता येत नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्त्याने जेव्हा सत्य परिस्थिती मीडिया समोर मांडली. त्याच्यानंतर त्यांची फजिती झाली आहे. ज्या वेळेस माणूस तोंडघशी पडतो. बोलायला काहीच राहत नाही. त्यावेळेस टि शर्ट घालणं असेल, टि शर्टवर काही लिहलं असेल अशी नौटंकी सुरु झाली. ज्या वेळेस आपल्याला खोटेनाटे प्रयत्न करून प्रश्न सुटला नाही, मग प्रश्न राहिला बाजूला त्याची दिशा बदलण्यासाठी रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका आमदार राम शिंदे यांनी केली.
माझ्या काळात जर एमआयडीसी मंजुर झाली तर ते माझं….
एमआयडीसीमध्ये दलालांच्या जमिनी भूसंपादन करण्यासाठी कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचा खटाटोप सुरु होता.आता त्यांच हे पितळ उघडं पडलं आहे. म्हणूनच ते थेट प्रश्नांवर बोलत नाहीत. वेगवेगळ्या प्रश्नाकडे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. ज्याला midc करायचीय त्याला करू द्या, ज्याला श्रेय घ्यायचायं त्याला घेऊ द्या, असं सकाळी कोणीतरी पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं. सध्या माझ्या पक्षाचं सरकार आहे.त्यामुळे लोकांना कळतं, कोणाच्या काळात काय मंजुर झाल्यानंतर श्रेय कोणाला द्यायचं, त्यांच्या काळात झालं नाही हे त्यांचं अपयश आहे. आता माझ्या काळात जर एमआयडीसी मंजुर झाली तर ते माझं यश आहे, असे शिंदे म्हणाले.