Flood | अतिमुसळधार पावसाने राज्यात अनेक भागांत पुराचं भीषण संकट; नौदलासह सैन्यदल उतरले बचावकार्यात

ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

मुंबई : कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपासून या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गुरूवारी काही भागात अतिमुसळधार पाऊस झाला. याचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसला. संपुर्ण शहर पुराच्या पाण्याने वेढले आहे. रत्नागिरी व रायगड या दोन्ही जिल्ह्यातील अनेक भागात पुराचा फटका बसला आहे.यासह राज्यातील अनेक भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पुराचं भीषण संकट निर्माण झालं आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्याकडे लागलं आहे. कारण ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. घरांमध्ये खांद्यापर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांनी घराच्या छताचा आश्रय घेतला आहे.पूरग्रस्त भागात बचावकार्य वेगाने सुरू आहे. NDRF टीमच्या मदतीसाठी आता नौदल व सैन्यदल उतरवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी संपर्क साधत पूरग्रस्त भागातील सद्यस्थितीचा आढावा ठाकरे यांच्याकडून जाणून घेतला आहे.( flood of Ratnagiri and Raigad district )

कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्हयांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच बिकट बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वशिष्ठी नदीला महापूर आला आहे. नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे चिपळूण शहरात जवळपास ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्यानं चिपळुणात मदत पोहोचणंही अशक्य बनलं आहे. रत्नागिरीत चिपळूणपर्यंतच कोकण रेल्वे वाहतूक सुरु आहे. पुढे सर्व गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकातच खोळंबल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. जिल्ह्यातल्या बहुतेक नद्यांमध्ये पाणी वाढल्यानं पूरस्थिती निर्माण झालेय. चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाले. वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं मुंबई – गोवा महामार्गावरचा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर इकडे चिपळूणच्या बहादूर शेख नाका परिसरातही नदीचं पाणी शिरलं आहे. इकडे चिपळूणच्या कापसाळ पायरवाडी परिसरात नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय, गावातही पाणी शिरलंय नदीकाठच्या सुकाई मंदिरातही पाणीच पाणी आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.

चिपळूणमधील गावात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, बस स्थानकातील बस पूर्णपणे पाण्यात बुडून गेल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच, शहरातील अनेक ठिकाणच्या चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा कोकणाला बसला असून रत्नागिरी जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. चिपळूण, खेडसह ज्या ज्या भागात खाड्या आहेत, त्या त्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. चिपळूणमध्ये बस स्थानक पाण्याखाली गेलं असून अक्षरश: बस पाण्यात बुडाल्या आहेत. तर, चिपळूण नगरीत स्वागताची कमानही पाण्यात बुडालेली दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. गुरुवारी मात्र अस्मानी संकटाने कहर केला. रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला.