Latur Latest News : सशस्त्र मनोरूग्णाला पकडण्यासाठी रंगला पाच तासांचा थरार…लातुरच्या बोरफळ गावातील घटना, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर!
Latur Latest News : लातूर जिल्ह्यातील बोरफळ गावामध्ये गेल्या तीन दिवसांपासून शस्त्रधारी मनोरुग्णांचा धुमाकूळ सुरू होता. दिसेल त्याच्यावर हल्ला करण्याचा तो प्रयत्न करत होता.यामुळे परिसरात त्याची मोठी दहशत पसरली होती. रविवारी या मनोरुग्णाला पकडण्यासाठी पोलीस व स्थानिकांनी मोहीम हाती घेतली होती.शस्त्रधारी मनोरुग्णाला पकडण्यासाठी तब्बल पाच तासांचा थरार रंगला होता. अखेर दोन तरुणांनी धाडस दाखवल्याने त्या मनोरुग्णाला पकडण्यात यश आले.यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
औसा तालुक्यातील बोरफळ गावामध्ये गेल्या तीन दिवसांपासून एक मनोरुग्ण हातात शस्त्र घेऊन गावात फिरत होता. तो दिसेल त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे बोरफळ व परिसरामध्ये त्या मनोरुग्णाची मोठी दहशत पसरली होती. दोन्ही हातात धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या त्या मनोरुग्णाला पकडण्यासाठी रविवारी पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी मोहीम राबवली. हातात कोयता घेऊन मनोरुग्ण पुढे आणि त्याच्या मागे पोलीस व नागरीक असे दृश्य घडत होते. तब्बल पाच तास हा थरार सुरू होता. पाच तासानंतर दोघा तरुणांनी धाडस दाखवत, त्या मनोरुग्णाच्या अंगावर मिरचीचे पाणी फेकले. मिरचीचे पाणी डोळ्यात गेल्याने तो खाली पडला. त्यानंतर सर्व नागरिकांनी मिळून त्या मनोरुग्णाला चांगलाच बेदम चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.
लातूरच्या औसा – तुळजापूर रोडवरील बोरफळ या गावातील चौकात नेताजी मांजरे हा मनोरुग्ण तरूण गेल्या तीन दिवसांपासून हातात शस्त्र घेऊन वावरत होता. नेताजी मांजरे याने संतोष कानमोडे या व्यक्तीवर धारदार कोयत्याने हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी औसा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर औसा पोलीस फौजफाट्यासह नेताजी मांजरे या मनोरुग्णाच्या शोधासाठी बोरफळ गावात दाखल झाले होते.
दोन्ही हातात धारदार कोयते घेऊन सदर मनोरुग्ण हा गावात भटकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. बोरफळ गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नेताजी मांजरे या मनोरुग्णाने चांगलाच हैदोस घातला. मात्र गावातील तरुणांनी आणि पोलीस पथकाने पाच तासाच्या प्रयत्नानंतर नेताजी मांजरे या मनोरुग्णाला बेड्या ठोकण्याची कारवाई पार पाडली. यामुळे बोरफळ गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
दरम्यान हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या मनोरुणाला दोन तरुणांनी धाडस दाखवत पकडल्यानंतर त्या मनोरुग्णाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मनोरुग्ण हातात कोयता घेऊन बोरफळ गावच्या चौकात उभा रहायचा आणि चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करायचा. गेल्या तीन दिवसांपासून त्या मनोरुग्णाने बोरफळ परिसरातील तीन जणांवर कोयत्याने हल्ला केला होता. यात ते तिघे जखमी झाले होते. मनोरुग्णाला पकडण्यासाठी 25 पेक्षा अधिक पोलीस मागावर होते. परंतु तो मनोरुग्ण पोलिसांवर हल्ला करायचा प्रयत्न करायचा. मनोरुग्ण धरपकडीचा थरार तब्बल पाच तास चालला. पाच तासानंतर त्या मनोरुग्णाला वेड्या ठोकण्याची कारवाई पोलिसांनी पार पाडली.