Savitribai Phule Jayanti 2025 : नायगाव येथे मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Savitribai Phule Jayanti 2025 : संपूर्ण देशभरात ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मभूमीत राज्य सरकारकडून सावित्रीमाई जयंती उत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
स्त्री शिक्षणाच्या जनक व देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा १९४ वा जयंती उत्सव शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राज्य सरकारकडून सावित्रीमाई जयंती उत्सव या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले जन्मस्थान असलेल्या स्मारकाची फुलांची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री अदिती तटकरे आमदार मकरंद पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज कुणीही एका भाषणात किंवा एका कार्यक्रमात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव करु शकत नाही. पण थोर माणसांचे कार्य कधीच संपत नसते. त्या त्या काळानुसार ते कार्य लोकांमध्ये रुजवत राहायचे असते. स्मारक हे केवळ पुतळ्यापुरते मर्यादित नाही. आपण अनेक पुतळे करतो. तिथे जाऊन त्यांचे स्मरणही करतो.पण पुतळ्यांसोबतच विचारांचेही स्मारक व्हायला हवे.
“तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे स्मारक बनवण्याची घोषणा केली होती. त्याचा आराखडा तयार झाला असून आमच्यापुढे त्याचे सादरीकरण झाले आहे. हे स्मारक सावित्रीबाईंच्या प्रतिमेपुरते मर्यादित नसून त्यांचा विचार रुजवून स्वंयपूर्ण महिला तयार करण्यासाठी आम्ही स्मारक तयार करून दाखवू. पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरु होईल. त्यापूर्वी हे स्मारक तयार ठेवले पाहिजे. यासाठी १० एकर जमीन अधिग्रहित करण्यासाठी तात्काळ कारवाई सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
ते पुढे म्हणाले की, “एकीकडे पाच वर्षानंतर सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरु होईल आणि दुसरीकडे देशाच्या लोकसभा आणि विधानसभेत महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्याने ३३ टक्के महिला खासदार आणि आमदार होतील. त्यामुळे आपल्या देशातसुद्धा हळूहळू सावित्रीआईंच्या नेतृत्वात महिला राज्य येण्याकडे आपण वाटचाल करत आहोत.”
…त्यावेळी सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण होईल!
“ज्यावेळी महिला आणि मुली सक्षमपणे समाजात वावरताना दिसतील त्यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे स्वप्न पूर्ण केले असे आपल्याला म्हणता येईल. सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्तारित स्वरुपात तयार करण्यासाठी सरकारचे प्राधान्य असेल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावर चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास होईपर्यंत सातत्याने काम करू,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ म्हणाले की, “सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी जे कष्ट घेतले आणि त्यांच्यावर जी दगडफेक व शेणाचा मारा झाला. फार दूरदृष्टीने महात्मा फुले यांनी काम केले. त्यांनी हे जे मोठं पाऊल उचललं त्यामुळे आज आपण देशातील मुली शिक्षण घेत असलेलं पाहत आहोत. आपल्या देशातील मुली शिक्षण घेऊन आता डॉक्टर, वकिल, मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती पदापर्यंत जात आहेत. उद्योगांमध्ये मुलींना आज जे यश मिळत आहे त्याचे श्रेय त्या काळी ज्यांनी शिवीगाळ सहन केली त्या फुले दाम्पत्याला जात आहे,” अशा भावना आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
भुजबळ पुढे म्हणाले की,”६ वर्षात सावित्रीबाईंच्या जयंतीला २०० वर्षे पूर्ण होतील. आजही आम्हाला मुलींना शिकवायचे जीवावर येते. पण मुलींना शिकवा. डॉक्टर, इंजिनिअर करा, त्यांचा खर्च सरकार करेल, असे अनेक निर्णय आपण घेतले. देवेंद्रजी सावित्रीबाईंचेच काम पुढे नेत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “या सरकारने खूप काम केलीत. मी विरोधी पक्षात होतो त्यावेळी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा नव्हती. त्याच विधानसभेच्या सभेत आम्ही ते करणार असे शिंदे आणि फडणवीस साहेबांनी उठून सांगितले. अनेक वर्षांचे आमचे स्वप्न काही महिन्यात त्यांनी पूर्ण केले. वढेच नाही तर तरुणांच्या सबलीकरणासाठी महाज्योतीसाठी ४५३ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. केंद्र सरकारने ओबीसी आयोगाला आयोगाचा दर्जा दिला. संविधानाचा दर्जा दिला. भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे त्यांच्यामुळेच सुरु झाले,” असेही ते म्हणाले.