ऊसतोड कामगारांवर वीज कोसळली, “वीज कोसळून तिघांचा होरपळून मृत्यू तर एक मुलगी गंभीर जखमी”, परतीच्या पावसाचा हाहाकार सुरुच !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात परतीच्या पावसाचे तांडव सुरु आहे. विजांच्या कडकडाटसह कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने तिघांचे बळी घेतल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेतील मृतांमध्ये बापलेकीसह कामगाराचा समावेश आहे.
मराठवाड्यातील अनेक भागाला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. आज सायंकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. नांदेडच्या लोहा तालुक्यातील धावरी तांडा परिसरात काम करणाऱ्या मजुरांवर सायंकाळी पाचच्या सुमारास वीज कोसळली. यात तीन जण ठार झाले. तर जखमी बालिकेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आज 18 रोजी दुपारपासूनच नांदेड लोहा परिसरात सर्वत्र ढग भरून आले होते.उकाडाही वाढला होता.अचानक सायंकाळी वादळी वारे, विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला.नांदेडच्या लोहा तालुक्यातील धावरी तांडा शिवारामध्ये काही ऊसतोड मजूर काम करत होते.
अचानक पाऊस आल्याने ते झाडाखाली थांबले होते.आणि त्याचवेळी घात झाला. वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसात वीज कोसळून तिघांचा होरपळून मृत्यू झाला तर एक बालिका गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात सुरु आहेत.
दरम्यान या दुर्दैवी घटनेत उसतोड कामगार माधव पिराजी डुबुकवाड (वय 45) राहणार पानभोसी, तालुका कंधार, मोतीराम शामराव गायकवाड (वय 46) राहणार पेठ पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी आणि दहा वर्षीय बालिका रूपाली पोचिराम गायकवाड यांच्या अंगावर वीज कोसळली. यात तिघांचाही होरपळून मृत्यू झाला.तर पूजा माधव डुबुकवाड ही बालिका गंभीर जखमी झाली. तिच्यावर नांदेडच्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेतील तीनही मृतदेह लोहा रुग्णालयात आणण्यात आले असून तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक व या भागातील सरपंच, पोलीस पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.