महाराष्ट्र संकटात : राज्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच; रविवारी आढळले ओमिक्रॉनचे 50 रूग्ण, मुंबई पाठोपाठ पुणेकरांच्या चिंता वाढल्या
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात कोरोनाने रविवारी सर्वात मोठा तडाखा दिला आहे. नव्या वर्षांत कोरोनाचा सुरू असलेला उद्रेक राज्यावर मोठ्या संकटाची चाहूल देऊ लागला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक रूग्ण वाढले आहेत. याशिवाय ओमिक्रॉनच्या रूग्णातही मोठी वाढ झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यात कोरोनाचा सुरू झालेला धुमाकुळ नव्या वर्षांत सुरू आहे. रविवारी कोरोनाचा विस्फोट झाला आहे. राज्यात 2 जानेवारी 2022 रोजी 11 हजार 877 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तब्बल 12 हजाराच्या आसपास रूग्णवाढ झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात रविवारी 50 ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे मनपा 36, पिंपरी-चिंचवड 8, पुणे ग्रामीण 2, सांगली 2, ठाणे 1, मुंबई 1 या 50 रूग्णांचा समावेश आहे. ओमिक्रॉनने रविवारी पुणे परिसराला मोठा तडाखा दिल्याने पुण्याच्या चिंता वाढल्या आहेत. रविवारी एकट्या पुणे भागात 46 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत.
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने सरकारचे टेन्शन वाढले आहे. राज्यात रविवारी दिवसभरात एकुण 2 हजार 69 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आज अखेर 2 लाख 43 हजार 250 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1091 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 42 हजार 24 इतकी झाली आहे.
राज्यात शनिवारी ओमिक्रॉनचे 50 नवे रूग्ण आढळून आले. त्यानुसार राज्यात आज अखेर 510 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 193 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. त्यानुसार आज अखेर सक्रीय ओमिक्रॉन बाधित रूग्णांची संख्या 317 इतकी आहे.
राज्यात सर्वाधिक सक्रीय कोरोनाबाधित मुंबई जिल्ह्यात आहेत. मुंबईतील रूग्णांची संख्या 29 हजार 819 इतकी झाली आहे. मुंबई खालोखाल ठाण्यातील रूग्ण संख्या वाढत आहे. ठाण्यातील सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 4 हजार 669 इतकी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 431 इतकी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 56 रूग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आज 88 नवे रूग्ण आढळून आले आहेत. जामखेड तालुक्यात थंडावलेला कोरोना डोके वर काढू लागला आहे.
राज्य सरकारमधील अनेक मंत्री तसेच आमदारांना कोरोनेचा तडाखा बसला आहे. अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदार तसेच इतर राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.