अहमदनगर जिल्हा हादरला, भीषण अपघात एकाच कुटुंबातील 5 जणांंचा मृत्यू मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश, पुणे-अहमदनगर महामार्गावरील दुर्घटना
Maharashtra । Five members of family died road accident near Ranjangaon MIDC on Ahmednagar-Pune Highway
पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांत अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचेही अपघाती निधन झाले. तर, बीड जिल्ह्यातच आणखी एका अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या घटना थांबताना दिसत नाहीत. बुधवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये, एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
चुकीच्या दिशेने प्रवास करत असलेला ट्रक अचानक रोडच्या मधोमध आल्याने कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. त्यामध्ये, कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातामध्ये संजय भाऊसाहेब म्हस्के (वय 53), राम भाऊसाहेब म्हस्के (वय 45), राम राजू म्हस्के (वय 7), हर्षदा राम म्हस्के (वय 4 वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय 16) वर्ष यांचा मृत्यू झाला असून साधना राम म्हस्के अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
रांजणगाव एमआयडीसीतील LG कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. या कारमधील सर्व प्रवासी पनवेलला जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहनं हटविण्यात आली आहेत.
या अपघातातील सर्व मृत व जखमी हे आवाने बुद्रुक (ता.शेवगाव, जि.अहमदनगर) येथील रहिवासी आहेत अशी माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील अहमदनगर-पुणे महामार्गावरील रांजणगाव एमआयडीसीजवळ काल रात्री झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या कंटेनरला कारची धडक बसल्याने हा अपघात झाला. कंटेनर चालक फरार झाला आहे अशी माहिती एसपी अभिनव देशमुख यांनी दिली आहे.