Maharashtra rain Update Live । महाराष्ट्रात पाऊस आला पण 6 जणांंचे बळी घेऊन गेला, कुठं घडली घटना ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : maharashtra rain update LIVE । काा मुंबईसह, कोकण, पुण्यापर्यंत मान्सून दाखल झाला आहे. राज्याच्या काही भागात शनिवारी पाऊस झाला. शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली खरी, मात्र अस्मानी संकटानेही वर्दी दिली.निसर्गाच्या अवकृपेने राज्यात सहा जणांंचे बळी गेले. (It rained in Maharashtra but 6 people were killed due to lightning Jalna Aurangabad)
शनिवारी मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड हिंगोली सहा आदी भागांमध्ये शनिवारी पाऊस झाला. अंगावर वीज पडून जालन्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच नांदेडमध्ये एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, या दुर्दैवी घटनांंमुळे मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे.
औरंगाबादमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली यादरम्यान तालुक्यातील सावखेडा (उटाडेवाडी) गावात वीज पडण्याची घटना घडली. या घटनेत शेतात काम करत असलेल्या संजय नथ्थू उटाडे (45) यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातही वीज पडण्याची घटना शनिवारी घडली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव या गावांमध्ये घडलेल्या घटनेमध्ये गजानन हरिश्चंद्र दराडे (27) या तरुणाचा वीज पडल्याने मृत्यू झाला.तसेच आडगाव जावळे या गावातही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात सांडू शामराव नजन यांच्या घरावर वीज कोसळली, या घटनेत सांडू श्यामराव नजन यांच्या बहिणीचा जागेवरच मृत्यू झाला. सरुबाई शहादेव लोंढे (40) असे मृत महिलेचे नाव आहे
जालन्यात वीज कोसळून तिघांचा बळी
जालना जिल्ह्यामध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दमदार पाऊस आला खरा,मात्र जालना जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा पाहायला मिळाली. जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये तिघांचे बळी गेले आहेत. ही घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि मंठा तालुक्यातून समोर आली आहे.
भोकरदन तालुक्यातील कोदा गावात वादळी पाऊस झाला. गंगाबाई पांडुरंग जाधव, दत्ता पांडुरंग जाधव, भारती गजानन जाधव हे शेतात काम करत होते. दुपारी अडीचला वादळी पाऊस झाला. यात अंगावर वीज कोसळून गंगाबाई पांडुरंग जाधव यांचा मृत्यु झाला. तर दत्ता पांडुरंग जाधव, भारती गजानन जाधव हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंठा तालुक्यातील पेवा गावातही वीज कोसळली.सायंकाळी पाच वाजता घडलेल्या घटनेत अनिल भारत शिंदे (22) या तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच माळकिण गावात वीज अंगावर कोसळून वसंत वामनराव जाधव (50) यांचा मृत्यू झाला.
राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सक्रिय आहे.त्यामुळे वीज पडण्याचा धोका अधिक आहे. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घेण्याची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.