Maharashtra Rajya Sabha Election Result 2022 LIVE । राज्यसभेचे निकाल जाहीर, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंंजय महाडिक तर मविआचे इम्रान प्रतापगढी, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल विजयी !
Maharashtra Rajya Sabha Election Result 2022 LIVE : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला. महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. धक्कादायक बाब म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीला दहा मतांचा फटका बसला.आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या चिंता वाढवणारा ठरला आहे.
सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. दुसऱ्या फेरीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी मतांचा कोटा पुर्ण करत बाजी मारली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
राज्यसभेचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे,
1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43
2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44
3. पियुष गोयल-भाजप- 48
4. अनिल बोंडे- भाजप- 48
5. संजय राऊत- शिवसेना- 42
6. धनंजय महाडिक- भाजप – 41
भाजपचा महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली.
भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात निकाल रखडला होता.
सुहास कांदे यांचे मत बाद
दरम्यान, भाजपने केलेल्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आलं. तर यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या आणि सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा या भाजपच्या आमदारांचे मत वैध असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. सुहास कांदे यांचे मत बाद ठरल्याने शिवसेनेच्या मताचे गणित बिघडले.
महाविकास आघाडीची दहा मते फुटली
राज्यसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या निकालात भाजपला एकुण 122 तर महाविकास आघाडीला 162 मते मिळाली. यात भाजपला दहा मते जास्त मि मिळाली भाजपला जे दहा मते जास्त मिळाले ती नेमकी अपक्षांची की इतर छोट्या पक्षांची याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या 10 मतांमुळे भाजपने आपला तिसरा उमेदवार जिंकवण्याची किमया केली.