Maharashtra Vidhan Parishad Sabhapati niwadnuk 2024 : विधानपरिषद सभापती पदासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड होणार !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Maharashtra Vidhan Parishad Sabhapati niwadnuk 2024 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे जेष्ठ नेते आमदार प्रा राम शिंदे यांनी आज नागपुर विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील सह महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार प्रा.राम शिंदे यांची बिनविरोध निवड होणार आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी १९ रोजी निवडणुक होणार आहे. यासाठी भाजपने पक्षाचे जेष्ठ नेते आमदार प्रा.राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानुसार आज १८ रोजी आमदार शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.विधानपरिषदेत महायुतीचे संख्याबळ पाहता प्रा राम शिंदे यांचा मोठा विजय निश्चित आहे. परंतू विधानसभा अध्यक्षाच्या निवडणूकीसारखीच विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
विधानपरिषदेत सर्वाधिक १९ आमदार भाजपचे आहेत. त्याखालोखाल अजित पवार गट, ठाकरे गट व काँग्रेस यांचे प्रत्येकी ०७ आमदार आहेत. शिंदे गटाचे ०६ आमदार आहेत. शरद पवार गट ०३ तर ०३ अपक्ष आमदार आहेत. महायुतीकडे ३२ तर महाविकास आघाडीकडे १७ तर ३ अपक्ष असे संख्याबळ आहे. महायुतीला अपक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. निवडणुक झाल्यास महायुतीचे उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे. विरोधकांकडून या निवडणूकीत उमेदवार दिला जाणार नाही. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्याची औपचारिक घोषणा उद्या १९ रोजी होणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून विधानपरिषद सभापतीपदाची महाराष्ट्रात परंपरा आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापन १९६० ला झाली. तेव्हा महाराष्ट्र विधानपरिषद अस्तित्वात आली. स्वातंत्र्यपूर्व ते आजपर्यंत १४ नेत्यांना विधानपरिषद सभापतीपदाची संधी मिळाली आहे. विधानपरिषदचे १५ वे सभापती म्हणून आमदार प्रा राम शिंदे हे विराजमान होणार आहेत. आमदार प्रा राम शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील ९ वे वंशज आहेत. भाजपातील अभ्यासू, शांत, संयमी आणि विकासाभिमूख असा बहुजन नेता अशी त्यांची ओळख आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद सभापतींची यादी खालीलप्रमाणे
स्वातंत्र्यपूर्व मुंबई विधान परिषद (१९३७ – ४७)
मंगल दास पाकवास २२ जुलै १९३७ – १६ ऑगस्ट १९४७ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
स्वातंत्र्योत्तर बॉम्बे विधान परिषद (१९४७ – १९६०
रामचंद्र सोमण १८ ऑगस्ट १९४७ – ०५ मे १९५२ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
रामाराव श्रीनिवासराव हुक्केरीकर – ०५ मे १९५२ – २० नोव्हेंबर १९५६ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
भोगीलाल धीरजलाल लाला – २१ नोव्हेंबर १९५२ – १० जुलै १९६० (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
महाराष्ट्र विधान परिषद (जन्म १९६०)
विठ्ठल सखाराम पेज – ११ जुलै १९६० – २४ एप्रिल १९७८ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
राम मेघे (कार्यवाहू) १३ जून १९७८ – १५ जून १९७८ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
आर. एस. गवई – १५ जून १९७८ – २२ सप्टेंबर १९८२ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)
जयंत श्रीधर टिळक – २२ सप्टेंबर १९८२ – ०७ जुलै १९९८ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
भाऊराव तुळशीराम देशमुख (कार्यवाहू) – २० जुलै १९९८ – २४ जुलै १९९८ (भारतीय जनता पार्टी)
ना. स. फरांदे – २४ जुलै १९९८ – ०७ जुलै २००४ (भारतीय जनता पार्टी)
वसंत डावखरे (कार्यवाहू) ०९ जुलै २००४ – १३ ऑगस्ट २००४ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
शिवाजीराव देशमुख – १३ ऑगस्ट २००४ – १६ मार्च २०१५ (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
रामराजे नाईक निंबाळकर – २० मार्च २०१५ – ०७ जुलै २०१६ व ०८ जुलै २०१६ – ०७ जुलै २०२२ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
नीलम गोऱ्हे (कार्यवाहू) ०८ जुलै २०२२ – १९ डिसेंबर २०२४ (शिवसेना)
प्रा राम (रामदास) शंकर शिंदे – १९ डिसेंबर २०२४
कोण आहेत आमदार प्रा राम शिंदे ?
आमदार प्रा राम शंकर शिंदे हे विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य असून राज्याचे माजी मंत्री आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात.
आमदार प्रा राम शिंदे यांचा परिचय
नाव – प्रा. राम शंकर शिंदे
जन्मतारीख – 1 जानेवारी 1967
शिक्षण – M.Sc., B.Ed.
(वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)
धर्म जात – हिंदु धनगर
पत्ता – मु.पो. चौडी, ता. जामखेड,
जि.अहमदनगर – 413205
मोबाईल क्र. -7774947777, 9423167460
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ
- प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य-2004 ते 2006
- तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-2006 ते 2009
- जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहमदनगर 2010 ते 2012
- सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य 2013 ते 2015
- प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य-2021
- सदस्य, भाजपा, कोअर कमिटी, महाराष्ट्र राज्य-2022
लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ
- सन 1997 – पंचायत समिती जवळा गण निवडणूकीत केवळ 218 मतांनी पराभव.
- सन 2000-2005 सरपंच, ग्रामपंचायत चौंडी
- सन 2002 – जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र केवळ एका मताने पराभूत.
- सन 2007 – 2012 – पंचायत समितीच्या जवळा गणातून पत्नी सौ. आशाताई राम शिंदे या जिल्ह्यातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आणि जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्या.
- सन 2009-2014 – आमदार, 227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 12,500 मतांनी विजयी.
- 2014-2019 आमदार, 227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 38,000 मतांनी विजयी.
- सन 2014-2016 या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.
- सन 2016-2019 या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.
- सन 2016 ते 2019 दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
- महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या अहमदनगरमध्ये पक्षवाढीसाठी इतर पक्षांतून अनेकांचा पक्षात प्रवेश घडवून त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आणि निवडून आणले
- 2019 च्या विधानसभा निवडणूकीत पराभव
- 2019 ते 2024 : पक्षाने विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रभारीपदी नेमणूक केली, यामध्ये गोवा, झारखंड, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील महत्वाच्या विधानसभा मतदारसंघांची प्रभारी म्हणून काम पाहिले. 2024 लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी काम पाहिले.
- सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवताना निसटता पराभव झाला. या निवडणुकीत 1 लाख 26 हजार 433 मते मिळवली. मात्र अवघ्या 1243 मतांनी पराभव पत्करावा लागला. 2019 ला मिळालेल्या मतांमध्ये 2024 ला तब्बल 35 हजार मतांची वाढ झाली.
- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांनी पवार घराण्यातील रोहित पवाररूपी बलाढ्य धनशक्तीविरोधात कडवी झुंज दिली. परंतू शेवटच्या फेरीत त्यांचा निसटता पराभव झाला. 2024च्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत होणारे आमदार प्रा राम शिंदे हे राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार ठरले