महाराष्ट्राला लवकरच मिळणार राज्यगीत : सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा, सरकारने कोणत्या गीताची ‘राज्यगीत’ म्हणून निवड केलीयं ? जाणून घ्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रासाठी लवकरच राज्यगीत जारी होणार आहे.सर्वांना परिचित असलेल्या एका प्रसिद्ध गीताची महाराष्ट्र गीत म्हणून निवड करण्यात आल्याची मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यगीतासाठी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून या गीतामधील दोन कडवी घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
“गर्जा महाराष्ट्र माझा हे उत्साह वाढवणारं गीत आहे. या गीताच्या शब्दांमध्ये एक उर्जा आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही भावना आहे. हे गीत साडेतीन मिनिटं वाजायचं. त्यामुळे आम्ही अनुमती घेऊन एक ते दोन मिनिटांमध्ये यातली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार केला आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, या गीतामधील नेमकी कोणती दोन कडवी राज्यगीतासाठी घेतली जाणार आहेत, याविषयी मात्र अद्याप पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही.
या गीतामधल्या ओळी पुढीलप्रमाणे.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा.
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा.
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा.
दरम्यान, यासंदर्भात अधिकृत घोषणा आणि तिची अंमलबजावणी कशी होणार? याविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.