Maharashtra Women Minister Portfolio : महायुती सरकार मधील महिला मंत्र्यांकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Women Minister Portfolio | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ३३ कॅबिनेट मंत्री व ६ राज्यमंत्री या सर्व मंत्र्यांना शनिवारी खाते वाटप करण्यात आले. महायुतीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ व मेघना साकोरे बोर्डीकर या चार महिला मंत्र्यांचा (mahila mantri maharashtra 2024) समावेश आहे. या महिला मंत्र्यांना कोणत्या मंत्रालयाचा कारभार मिळाला आहे ? ते सविस्तर जाणून घेऊयात ! (Pankaja Mundhe, Aditi Tatkare, Madhuri Misal, Meghana Sakore Bordikar)

Maharashtra Women Minister Portfolio, Which ministry responsibility of women minister Pankaja Munde, Aditi Tatkare,  Madhuri Misal, Meghana Sakore Bordikar in maharashtra government? Know in detail, mahila mantri maharashtra,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये भाजपने ३ तर राष्ट्रवादीने एका महिला नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. या चार महिला नेत्यांपैकी पंकजा मुंडे व आदिती तटकरे यांना मंत्रीपदाचा अनूभव आहे. या दोन्ही नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माधुरी मिसाळ व मेघना साकोरे बोर्डीकर या दोन्ही नेत्यांचा मंत्रिमंडळात पहिल्यांदा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे वजनदार विभागाचे राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

पंकजाताईंकडे पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्रालय

भाजपचा ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रीपदी काम करण्याचा अनुभव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळ त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून सरकारमध्ये काम केले. २०१९ मध्ये त्यांचा विधानसभेत पराभव झाला. त्यामुळे मागील पाच वर्षे त्या सरकारमध्ये सहभागी नव्हत्या. भाजपने त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन केले. २०२४ निवडणुकीत स्थापन झालेल्या फडणवीस सरकारमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

अदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्रालय

२०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकार व महायुती सरकारमध्ये सलग पाच वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी आदिती तटकरे यांना मिळाली. आदिती ह्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कन्या आहेत. आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास मंत्री म्हणून यापुर्वी काम केले. त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात महायुती सरकारने महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ आणली. या योजनेची अंमलबजावणी महिला व बालविकास विभागाने केली.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागाची जबाबदार देण्यात आली आहे.

मेघना बोर्डीकर साकोरे यांच्याकडे ६ खात्याची जबाबदारी

मेघना साकोरे बोर्डीकर ह्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातील भाजपा आमदार आहेत. उच्चशिक्षित असलेल्या मेघना बोर्डीकर यांचा भाजपने मंत्रिमंडळात समावेश केला आहे. त्यांना पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.मेघना बोर्डीकर ह्या आयपीएस अधिकारी दिपक साकोरे यांच्या पत्नी आहेत. बोर्डीकर यांचे वडिल रामप्रसाद बोर्डीकर हे सलग पाच वेळा आमदार राहिले आहेत. मेघना बोर्डीकर यांनी २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

मेघना बोर्डीकर यांच्यामुळे परभणी जिल्ह्याला १४ वर्षानंतर मंत्रीपद मिळाले आहे. बोर्डीकर ह्या परभणी पीडीसीसी बँकेच्या संचालक आहेत. याशिवाय त्या उद्योजिका आहेत. उच्चशिक्षित असलेल्या बोर्डीकर यांचे शिक्षण पुण्यातील डी.वाय. पाटील काॅलेजमध्ये झाले. त्या बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर आहेत. महायुती सरकारमध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या मोठ्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

माधुरी मिसाळ यांच्याकडे या ५ विभागांचा कारभार

माधुरी मिसाळ ह्या पुणे शहरातील पर्वती मतदारसंघातील आमदार आहेत. त्या सलग चौथ्यांदा या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.त्यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याकडे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास या मोठ्या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत किती महिला आमदार निवडून आल्या ?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २१ महिला आमदार निवडून आल्या आहेत.यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १४ महिला आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या ४, शिवसेनेच्या २ व काँग्रेसच्या १ महिला आमदाराचा समावेश आहे. त्यातील सत्ताधारी गटाच्या २० महिला आमदार आहेत. २० पैकी ४ महिला आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भाजपने ३ तर राष्ट्रवादीने एका महिला आमदाराला मंत्रीपदाची संधी दिली आहे.मात्र शिवसेनेने एकाही महिला आमदाराला मंत्रीपदाची संधी दिलेली नाही.