Mahayuti News Today : मंत्रिपदाची संधी हुकल्याने महायुतीत नाराजीची लाट, ऐन कडाक्याच्या थंडीत राजकारण तापले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Mahayuti News Today : रविवारी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा नागपुरमध्ये विस्तार पार पडला. महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीच्या इच्छुकांमध्ये नाराजीची लाट निर्माण झाली आहे. अनेकांनी आपल्या मनातली खदखद थेट मीडियासमोर जाहीर करत महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचा थेट संदेश जनतेला दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले. विरोधी महाविकास आघाडीचा मानहानिकारक पराभव झाला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी जुन्या व नव्या दमाच्या नेत्यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच निर्माण झाली होती. अनेक जुन्या नेत्यांचा पत्ता कट करत महायुतीने ३९ मंत्र्याचा शपथविधी रविवारी नागपुरात उरकून घेतला. शपथविधी पार पडताच महायुती नाराजी नाट्य रंगल्याचे समोर आले.
महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी,शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीपदासाठी अनेक नेते इच्छूक होते. ज्यांना मंत्रिपदाची लाॅटरी लागली त्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, परंतू ज्या नेत्यांना डावलण्यात आले त्यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे. महायुतीतील अनेक आमदारांकडून जाहीरपणे नाराजी बोलून दाखवण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी अधिवेशन सोडून मतदारसंघात परतण्यास सुरूवात केली आहे.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही मंत्रीपद न मिळाल्याने सोमवारी पत्रकार परिषदेत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. नाराज भुजबळ हे अधिवेशन सोडून तडकाफडकी नाशिकला रवाना झाले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे जेष्ठ नेते तानाजी सावंत यांनी रविवारी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. सावंत हेही नाराज असल्याचे बोलले जात आहे.
भाजपातही नाराजीनाट्य सुरु झाले आहे. भाजपचे विदर्भातील आमदार कृष्णा खोपडे यांच्या समर्थकांनी संघटनात्मक पदांचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आमदार संजय कुटे यांच्याही समर्थकांमध्ये नाराजी आहे. आमदार रवि राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी थेट अमरावती गाठली आहे. आमदारावतीत भाजपचे सात आमदार निवडून आले आहेत. त्यातील एकालाही पक्षाने मंत्रिपदाची संधी दिली नाही. रवि राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असलेल्या धनगर समाजालाही यंदा भाजपने डावलले आहे. ओबीसी समाजाला न्याय देताना धनगर समाजातील आमदार प्रा राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर या दोन्ही नेत्यांपैकी एकाची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा होती, परंतू भाजपने दोन्ही नेत्यांना मंत्रिपदी संधी दिली नाही. दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. परंतू पक्षाने त्यांचा विचार केला नाही.
भाजपचा परंपरागत मतदार असलेल्या धनगर समाजातील राम शिंदे व गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता व धनगर समाजातून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज असलेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती निवड होऊ शकते अशी शक्यता आहे. शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती निवड करुन भाजप धनगर समाजाची नाराजी दुर करणार का याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
मला मंत्रिपदाची अपेक्षा नव्हती. पण त्यापेक्षा मी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून मिळालेल्या वागणुकीने व्यथित झालो आहे. आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हे, अशी जाहीर नाराजी विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली.
मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्हीदेखील नाराज आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर विजय शिवतारे यांनी म्हटले की, मंत्रीपद मिळाले नाही, याचं काही वाटत नाही. पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रिपदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे.
यामध्ये कोणाचं नाव घ्यायची गरज नाही. पण एक सौजन्य असायला हवे. आम्ही कार्यकर्ते म्हणजे कोणी गुलाम नाहीत ना? नाराजीचं कारण हे आहे, की अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. ज्याप्रकारे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. तिन्ही नेत्यांकडून चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, ते सौजन्य सुद्धा त्यांनी दाखवलं नाही . ज्या प्रकारे महायुतीमध्ये असताना विरोधात उमेदवार उभे केले गेले. याबद्दल तिन्ही नेत्यांपैकी कोणीही कोणाला बोलत नाही. मंत्रीपद महत्त्वाचे नव्हते. पण माझी जी कपॅसिटी राज्याच्या विकासासाठी वापरायची गरज होती, ती आता वापरली जाणार नाही. माझं एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतंही बोलणं झालं नाही. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण विभागीय समतोलापेक्षा जातीय समतोलाला प्राधान्य दिले जात आहे, असे विजय शिवतारे यांनी म्हटले.