जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Mahendra More : भाजप आमदाराने शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखीन एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत भाजपच्या माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून उघडकीस आली आहे. बुधवारी भर दुपारी झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा हादरून गेला आहे.
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. जळगावच्या चाळीसगावमध्ये पाच हल्लेखोरांनी भाजपच्या माजी नगरसेवकावर बेछूट गोळीबार केला असून या घटनेत माजी नगरसेवक महेंद्र मोरे (Mahendra More) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. या प्राणघातक हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ धाव घेत वेगाने तपास सुरू केला आहे.
चाळीसगाव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्यात मोरे हे गंभीर जखमी झाले आहे. ही थरारक घटना हनुमानवाडी भागातील देवरे हाॅस्पीटल समोर घडली. या प्राणघातक हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कारमधून पाच जण उतरताना दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रूमाल बांधला असल्याचे दिसत आहे. एका पाठोपाठ एक असे पाच जण हातात बंदुका घेवून आले आणि त्यांनी गोळीबार केला. महेंद्र मोरे हे आपल्या स्टेशन रोडस्थित ऑफीसमध्ये बसलेले असताना, अचानकपणे हल्लेखोरांनी ऑफीसमध्ये प्रवेश करुन, त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
या गोळीबारमध्ये माजी नगरसवेक महेंद्र मोरे थोडक्यात बचावले आहेत. परंतू त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला तीन ते चार गोळ्या लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
ही थरारक घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. अज्ञात हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.