Mangesh Chivate Letter: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाच्या जबाबदारीतून मुक्त होताच मंगेश चिवटे यांनी लिहीले फेसबुकवर पत्र, पत्रात चिवटे काय म्हणाले ? वाचा सविस्तर

Mangesh Chivate letter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde dcm) यांचे विश्वासू मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांच्याकडून सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली आहे. मंगेश चिवटे यांच्या जागी डाॅ रामेश्वर नाईक (Dr Rameshwar Naik) यांची या विभागाच्या प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मंगेश चिवटे यांनी आपल्या भावना मांडण्यासाठी फेसबुकवर एक पत्र लिहीले आहे. या पत्रात चिवटे यांनी नेमकं काय म्हटलं आहे? पाहूयात सविस्तर

Mangesh Chivate Letter, Mangesh Chivate wrote letter on Facebook as soon as he was released from  responsibility of Chief Minister Medical Relief Fund Department, what did Chivate say in letter? Read in detail,

प्रति,
सर्व रुग्ण, रुग्णसेवक, रुग्णांचे नातेवाईक आणि हितचिंतक बंधू भगिनींनो..

सस्नेह जय महाराष्ट्र,

प्रथमतः मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी या आरोग्यमंदिराच्या सेवेचा कार्यभार माझे मित्र श्री. रामेश्वरजी नाईक यांच्याकडे सोपविण्यात मला अत्यानंद होत आहे. सुरुवातीलाच मी त्यांचे अभिनंदन करतो. मागील अडीच वर्षात लोकप्रिय मुख्यमंत्री, मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून सेवा करण्यास मला मिळालेली संधी ही ईश्वरकृपेने मी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि ध्येयवेड्या पद्धतीने निभावली, याचा मला मनोमन आनंद व अभिमान आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेव आणि खा. डॉ. श्रीकांतजी शिंदे या संवेदनशील पितापुत्रांमुळेच ही रूग्णसेवा करणे शक्य झाले. राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा. श्री अजितदादा पवार साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

राज्यातील सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्धर आजारांसाठी (कर्करोग, मेंदुरोग, हृदयविकार, किडणी / यकृत प्रत्यारोपण) तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष असावा, अशी संकल्पना मी २०१४ मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हा मांडली होती; त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी ११ मार्च २०१५ मध्ये या संकल्पनेस मान्यता दिली आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अस्तित्वात आला.

जून २०२२ मध्ये शिवसेना मुख्यनेते मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाल्यानंतर शिवसेना- भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झाले. या महायुती सरकारच्या काळात संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षामध्ये, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा अंतर्गत, कक्ष प्रमुख म्हणून कार्यरत असताना आमच्या निस्वार्थी टीमच्या साथीने एकूण ४१९ कोटी पेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. यामुळे ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचले. (रुग्णांच्या मदतीसाठी एकुण ३८१ कोटी २० लक्ष रुपये, तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणुन ३८ कोटी ६६ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले).

गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कामकाज रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज सुमारे १२ तास सुरु असे. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी देखील कामकाज सुरू असे. अगदी सण-उत्सवाच्या काळात देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सहकाऱ्यांनी काम केले. त्याबद्दल मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मी आयुष्यभर ऋणात राहील.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत सर्वसामान्य रुग्ण डोळ्यासमोर ठेवून अनेक विविध बदल करत १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला.

  1. यामध्ये टोल फ्री क्रमांक ८६५०५६७५६७ सुरु केला. सोबतच रुग्णांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागु नये यासाठी Online Application प्रणाली सुरु केली. (आता E-Mail व्दारे अर्ज स्विकारले जातात).
  2. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये रुग्णालय अंगीकृत (Hospital Empanelment) प्रक्रिया तसेच या योजनेअंतर्गत रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपुर्णतः निःशुल्क/मोफत असल्याची जनजागृती केली.
  3. ना वशिला, ना ओळख, थेट मिळते मदत हे ब्रिद वाक्य करुन हा कक्ष लोकाभिमुख बनवला.
  4. या योजनेच्या नावाखाली गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दलालांची साखळी तोडण्यास आमच्या टीमला यश मिळाले. अशा आढळून आलेल्या अपप्रवृत्तीवर छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करुन उचित पोलीस कार्यवाही करण्यात आली.

गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ऑनलाईन, पूर्णतः निःशुल्क आणि पारदर्शक केल्याने आता ही केवळ एक योजना राहिली नसून, ती लोकचळवळ करण्यात मला व आमच्या सर्व सहकाऱ्यांना यश आले होते. हे वास्तव आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याला मंत्रालयात नव्हे तर गावपातळीवरील रुग्णसेवकाशी केवळ संपर्क करावा लागत होता, ही सर्वात मोठी उपलब्धी मला माझ्या काळात करता आली, याचा मनोमन आनंद आहे.

माझ्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या निकषातील आजारांची संख्या वाढवणे, निधीची/मदतीची मर्यादा वाढवणे, उत्पन्नमर्यादेची अट शिथील करणे, योजनेच्या लाभासाठी सुलभता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाईन करणे, यांसारखे बदल करण्यात मला यश आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अडीच वर्षात तब्बल ५१ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ४१९ कोटी रुपयांची मदत वितरीत करता येणे, हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील हजारो निःस्वार्थ रुग्णसेवकांचे यश आहे.

माझ्यातील रुग्णसेवक कालही जिवंत होता, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असेल ही ग्वाही पत्राच्या उत्तरार्धात विनम्रपणे मी आपणाला देतो. रूग्णसेवेचा हा पवित्र यज्ञ यापुढील काळात संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा.खा.डॉ.श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे आणि अविरतपणे सुरूच राहणार आहे.

माझ्यासाठी पद महत्वाचे नसून वरिष्ठांच्या आशिर्वादाने माझ्या हातून घडणारी सेवा, ही माझ्या कार्याची प्राथमिकता असणार आहे. येणाऱ्या काळात काल जशी आरोग्यसंकट काळात हक्काने आठवण काढत होता, त्याचप्रमाणे पुढील काळात देखील मी तुमच्यासोबत कायम असेल हे अभिवचन यानिमित्ताने देतो. तुम्हा सर्वांच्या प्रेमापुढे मी अविरत नतमस्तक आहे. दरम्यानच्या काळात मदतीसाठी प्रत्यक्ष किंवा दुरध्वनीद्वारे आलेल्या रूग्णांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत; परंतु तांत्रिक कारणामुळे अथवा शासकीय नियमावलीमुळे कोणास मदत मिळू शकली नसल्यास मनःपूर्वक दिलगीरी व्यक्त करतो.

धन्यवाद।

आपला कृपाभिलाषी
रुग्णसेवक मंगेश चिवटे.