mantrimandal vistar 2024 : ३३ वर्षांनंतर नागपूरमध्ये होणार महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटपात कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळाले ? जाणून घ्या
mantrimandal vistar 2024 : अखेर महायुती सरकारच्या (mahayuti sarkar) मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. उद्या १५ रोजी उपराजधानी नागपूरमध्ये महायुती सरकारच्या (mahayuti sarkar maharashtra) मंत्रिमंडळाचा पहिल्या विस्तार होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात जवळपास ३५ ते ४० आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. मलईदार खात्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच असल्यामुळे महायुती सरकारच्या खातेवाटपाचा पेच निर्माण झाला होता. मात्र आता तिन्ही पक्षांमध्ये खाते वाटपावर एकमत झाले आहे. महायुती सरकार स्थापनेच्या दोन आठवड्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या १५ रोजी नागपुरमध्ये होणार आहे.

५ डिसेंबर रोजी महायुती सरकारची स्थापना झाली. राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होत असताना शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी वजनदार खात्यांसाठी भाजपकडे आग्रह धरला होता. मंत्रिपदाचा तिढा न सुटल्याने मुंबई पासून दिल्ली पर्यंत बैठकांचा धडाका सुरु होता. अखेर तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीपदावरून आता एकमत झाले आहे. यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपुरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागपुरच्या राजभव परिसरात जोरदार तयारी सुरु आहे.
गृह, अर्थ, महसुल व नगरविकास या महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होऊन तिढा निर्माण झाला होता. त्याचबरोबर कोणत्या पक्षाला जास्त मंत्रीपद, कोणत्या पक्षाला कमी मंत्रिपद यावरून नाराजी नाट्य रंगले होते. मात्र महायुतीत मंत्रिपद वाटपावरून सुरु असलेला तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वता:कडे गृह खाते ठेवतील अशी चर्चा आहे. त्याचबरोबर महसुल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, आदिवासी विकास, पर्यटन, वने ही महत्वाची खाती भाजपकडे असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडे वित्त, सहकार, कृषि, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न आणि औषध प्रशासन, क्रिडा आणि युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन ही खाती जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे हीच खाती होती. आता फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे तीच खाती कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्या १५ रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरमध्ये पार पडणार आहे. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. भाजपचे २१, शिवसेनेचे १२ तर राष्ट्रवादीचे १० असे ४३ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. परंतू भाजप व शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छूकांची संख्या अधिक असल्याने हे दोन्ही पक्ष आपल्या कोट्यातील मंत्रिपदाच्या काही जागा रिक्त ठेवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी राजभवनात होणार आहे. त्या अनुषंगाने नागपुरात येथे मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज ठेवण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नागपुरमध्ये १९९१ साली मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनंतर नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. १९९१ साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंड करत काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्यांचा शपथविधी नागपुरमध्ये पार पडला होता.