Marathi classical language : घटस्थापनानिमित्त महाराष्ट्राला मिळाले मोठे गिफ्ट, केंद्र सरकारने मराठीला दिला अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषा म्हणजे काय? त्याचे निकष आणि फायदे काय ? जाणून घ्या सविस्तर

Marathi classical language : जगभरातील मराठी भाषिकांसाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही गेल्या अनेक वर्षांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मान्य केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेसोबत बंगाली, पाली, असामी आणि प्राकृत भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात भाषा म्हणजे काय ? त्याचे निकष आणि फायदे काय ? जाणून घेऊयात.

Marathi classical language news, Maharashtra Receives big Gift on Ghatsthapana, Central Government Grants Classical Status to Marathi Language - What is Classical Language? Criteria and Benefits, marathi bhasha ,

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी त्या भाषेचा इतिहास १५०० ते २००० वर्षे इतका जुना असायला हवा, ती भाषा स्वतंत्र असावी, तिला अस्सल साहित्यिक परंपरा असावी, त्याचबरोबर त्या भाषेची प्राचीन साहित्य संपदा असावी, त्याचा इतर भाषिकांनाही फायदा व्हावा असे निकष पुर्ण करणाऱ्या हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेला केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा देते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी सरकारने मान्य केली. मराठी भाषा आता अभिजात भाषा झाली आहे.

भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यास काय फायदे होतात ?

मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून आर्थिक पाठबळ मिळणार, मराठी भाषेसाठी काम करणार्‍या संस्थांना सरकारकडून आर्थिक मदत मिळणार, मराठी बोली भाषा, संशोधन, साहित्य संग्रहाला चालना मिळणार, प्राचीन ग्रंथांचा अनुवाद, देशभरातील विद्यापीठात मराठी भाषा शिकवण्याची सोय होणार, महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांना बळकट करण्यासाठी मदत होणार,

पठारे समितीचा अहवाल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात सन २०१२ साली सरकारने मराठी भाषेला दर्जा मिळावा याकरिता जेष्ठ साहित्यिक प्रा रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. सन २०१३ पठारे समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. महरठ्ठीपासून सुरु झालेला भाषेच्या उच्चाराचा प्रवास महरठ्ठी-मराठी असा झाला, असा निष्कर्ष पठारे समितीनं मांडला. महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्यापूर्वी कित्येक वर्ष मराठी भाषा प्रचलित होती. मराठी भाषेचं वय किमान अडीच हजार वर्ष असल्याचे पुरावे असल्याचं पठारे समितीनं त्यांच्या अहवालात म्हंटले होते.

महायुती सरकारच्या मागणीला मोठे यश

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता जोरदार पाठपुरावा केला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सरकारकडे जोरदार आग्रह धरला होता. अखेर महायुती सरकारच्या मागणीला मोठे यश मिळाले. महायुती सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला.

मराठी भाषा ही भारताचा अभिमान  – नरेंद्र मोदी

मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला – एकनाथ शिंदे

एवढ्या जगात माय मानतो मराठी!
धन्यवाद आदरणीय मोदीजी! माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. समस्त मराठी भाषकांतर्फे मी आपले मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या समर्थ पाठबळमुळे हे शक्य झाले. अभिजात दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागणी न्याय्य होती हे आता जगाला पटेल. मोदीजी, आपण माय मराठीचे पांग फेडले आहेत! पुन्हा एकवार धन्यवाद!

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस, अत्यंत अभिमानाचा क्षण  – देवेंद्र फडणवीस

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥

समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!

आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो.

हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे- राज ठाकरे

आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, श्री. नरेंद्र मोदी यांच्यासमोर  केली होती. तेंव्हा श्री. नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत श्री. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा’ ही होती.

माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार.

मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया.

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत.

  • भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
  • या भाषेत प्राचीन साहित्य हवं, भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावं,
  • ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी,
  • अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

२०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक श्री. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी श्री. रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो… तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील…

  • मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल.
  • भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.
  • प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल.
  • महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील.
  • मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल.
  • प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
  • अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.

या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता. जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन.

प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे.

पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन…

राज ठाकरे