Bail Pola 2021 | बळीराजाचे आयुष्य समृध्द करणारा सर्जा राजा.. जाणून घ्या बैलपाळा आणि त्याचे महत्व
भारतीय संस्कृतीचे विशाल आणि वेगळेपण आपण साजरे करत असलेल्या सणांद्वारे ओळखता येते. बैल पोळा हा शेतकऱ्यांसाठी एक विशेष उत्सव आहे. जेथे ते बैलांची पूजा करतात आणि त्यांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात. भारताच्या 58% पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी शेती हा उपजीविकेचा प्राथमिक स्त्रोत आहे. शेतकरी बैलांवर अवलंबून असतात. शेतीच्या अर्थकारणात बैल हा प्राणी महत्वाची भूमिका बजावत आहे.
श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला ज्या त्या प्रदेशानुसार बैलपोळा हा सण साजरा करण्यात येणारा महाराष्ट्रात श्रावणातील पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो.वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. या सणाला शेतकरी कुटूंबात मोठा उत्साह असतो.
बैल पोळा हा प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या ग्रामीण भागात साजरा केला जातो. हा सण हिंदू श्रावण महिन्या पिठोरी अमावस्येला (अमावस्येच्या दिवशी) येतो. या सणाचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे. तेलंगणात याला ‘पुलाला अमावस्या ” म्हणतात.तर काही ठिकाणी बेंदूर असे म्हणतात. दक्षिण भागात मट्ट पोंगल आणि उत्तर व पश्चिम भागात याला गोधन असे म्हणतात.वर्षभर काम केल्यानंतर शेतकरी आपल्या बैलांना शेतातून विश्रांती देण्याचा निर्णय घेतात. उत्सवाच्या दोन दिवस आधी तयारी सुरू होते.
बैल पोळ्या दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. गावात मिरवणूक झाल्यानंतर घरी महिला बैलांची पूजा करतात. काही ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा करतात. आदल्या दिवशी खांदंमळणी केली जाते. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं. झुल चढवली जाते. गळ्यात चंगाळी, शिंगाना रंगवलं जातं.दोर (वेसण) बैलाच्या नाकपुडीतून काढला जातो. ते शेंगदाण्याचे तेल आणि हळद पावडरची पेस्ट त्यांच्या खांद्यावर लावतात, त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ घालतात.
बैलांना आंघोळीसाठी जवळच्या नदी/तलावात नेले जाते. त्यांची शिंगे दोलायमान रंगांनी रंगवलेली असतात आणि ती सर्व दागिन्यांनी सजलेली असतात. त्यांच्या दोरी आणि घंटा बदलल्या जातात. शेवटी, त्यांची मान फुलांच्या माळा आणि शोभेच्या शालीने सुशोभित केली जाते. या व्यवस्थेनंतर, शेतकऱ्यांकडून त्यांची पूजा केली जाते.
रस्त्यावरून उत्साही मिरवणुकीसाठी सुंदर सजवलेल्या बैलांना नेण्यासाठी संध्याकाळची वेळ राखीव आहे. गावकरी ढोल, ताशा, लेझीम (एक ठराविक भारतीय वाद्य) इत्यादी वाद्ये वाजवतात. या जत्रांचे प्रमुख आकर्षण म्हणजे मैदानी खेळ आणि स्पर्धा. शहरांमध्ये लोक प्रत्यक्ष बैलांऐवजी पुतळ्यांची पूजा करताना दिसतात.
पैल पोळ्यादिवशी शेतकरी वर्गात मोठा उत्साह असतो. आपापल्या बैलांसह इतर गुरांनाही ते मनोभावे अंघोळ घालून सजवतात. बैल सजवण्यातही मोठी स्पर्धा असते. ग्रामदैवताच्या अंगणात जेव्हा बैलजोड्या दर्शनासाठी आणल्या जातात तेव्हा अख्खा गाव तिथे उपस्थित असतो. गावकरी मग कुणाची बैल जोडी आकर्षक होती यावर मग पुढचे काही दिवस चर्चा करतात. ज्या शेतकर्याची बैलजोडी आकर्षक असते त्याचेही कौतूक होते. ग्रामीण संस्कृतीत हा महत्वाचा सण मोठा ऊर्जादायी अनुभव देणारा असतो.
‘पोळ’ (कठाळ्या) म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती आता अनेक शेतकऱ्याकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कुठून? या बैलाला काही ठिकाणी पोळ म्हणतात तर काही ठिकाणी ‘पोळ्याचा वळू’ तर काही गावात या बैलालाच पोळा (कठाळ्या) म्हणतात. या बैलाला गावावर सोडण्यापूर्वी त्याला धुऊन, रंगवून सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात ‘तू वासरांचा पिता` अशा अर्थाचा मंत्र म्हणत. ‘हा तुमचा पती आहे.’ अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, आणि मोठ्याने डिरक्या देणारा बैलच निवडला जायचा.
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धर्तीवर अवतरले तेव्हापासून कृष्णाचा मामा कंसाने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो अशी पौराणिक कथा सांगितली जाते.