जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अहमदनगर – बीड- परळी हा रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. या मार्गातील पहिल्या टप्प्यातील अहमदनगर – सोलापूरवाडी – कडा – आष्टी या मार्गावर बुधवारी रेल्वे धावली. रेल्वे धावताना पाहून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.
अहमदनगर – बीड-परळी हा 261 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी मोठी राजकीय लढाई लढली गेली.1995 साली या मार्गाला पहिल्यांदा तत्वता: मंजुरी मिळाली.मात्र अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. राजकीय इच्छाशक्ती अभावी प्रकल्पाला निधी मिळणे अवघड झाले होते. परंतू स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकीय ताकद पणाला लावत निधी मिळण्यात यश मिळवले होते.
तीन हजार कोटी रूपये पेक्षा अधिक खर्चाच्या अहमदनगर बीड परळी या 261 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर लोहमार्गाचे काम पुर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेकडून विविध चाचण्या केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हायस्पीड रेल्वेची चाचणी रेल्वेने हाती घेतली.
अहमदनगर ते आष्टी या साठ किलोमीटरची लोहमार्गावर रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील महिन्यात या मार्गावरून रेल्वे धावणार होती मात्र तांत्रिक अडचणी आल्यामुळे रेल्वे धावू शकली नव्हती. रेल्वे धावण्यासाठी 29 डिसेंबरचा मुहूर्त ठरविण्यात आला होता.
त्यानुसार आज बुधवारी सकाळी अहमदनगरहून आष्टीच्या दिशेने रेल्वे धावली आणि गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्हावासियांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. सोलापूरवाडी, कडा, आष्टी या ठिकाणीहून रेल्वे धावली. रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव येथील सर्वात मोठ्या रेल्वे पुलावरून हायस्पीड रेल्वे आज बुधवारी सुखरूपपणे धावली. हा 15 स्पॅनचा पूल असून प्रत्येकाची लांबी 30.5 मीटर आहे. म्हणजेच जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचा तर शंभर फूट उंचीचा हा पूल आहे.
दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास याच मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आष्टीकर जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.बीडच्या खासदार प्रितम मुंडे ह्याही आज दुपारी आष्टी तालुक्यात दाखल होणार आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अहमदनगर ते आष्टी मार्गावर विविध चाचण्या सध्या सुरू आहेत. लोहमार्गावरील गावांमधील नागरिक हायस्पीड रेल्वे कधी धावणार याकडे नजरा लावून आहेत.
उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये !!! माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली @DrPritamMunde अजून एक record तुमच्या नावावर…thanks @Dev_Fadnavis @SMungantiwar आणि @narendramodi @PMOIndia आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिले.. धन्यवाद!! pic.twitter.com/SEoSUUXV2c
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 28, 2021