जामखेड टाईम्स वृत्तसेवा : High speed train | बीड जिल्हा नव्हे तर मराठवाड्याला विकासाच्या महामार्गावरून वेगाने धावण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या अहमदनगर – बीड – परळी रेल्वे महामार्गावरून हायस्पीड रेल्वे धावण्याचा मुहूर्त निघाला आहे. अहमदनगर ते आष्टी रेल्वेमार्गावरील सोलापूरवाडी ते आष्टी रेल्वे कधी धावणार ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. (High speed train to run on Solapurwadi to Ashti railway line on 29th and 30th December)
अहमदनगर- बीड – परळी हा रेल्वेमार्ग अनेक निवडणुकांचा मुद्दा राहिलेला आहे. राजकीय मैदानातून हा प्रश्न निकाली निघाला याकरिता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अनेक वर्षे लढाई लढली. याचा सकारात्मक परिणाम समोर आला आणि प्रत्यक्ष रेल्वेमार्ग बांधणीस सुरूवात झाली. आणि अहमदनगर ते आष्टी मार्गावरील काम पूर्ण झाले आहे.आता या मार्गावर रेल्वेकडून विविध चाचण्या हाती घेण्यात आल्या आहेत.
अहमदनगर ते आष्टी या रेल्वेमार्गावरील सोलापूरवाडी ते आष्टी या रेल्वेमार्गावर जलदगती चाचणी करण्यासाठी येत्या २९ व ३० डिसेंबर रोजी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वेमार्गाच्या तांत्रिक गोष्टी तपासल्या जात आहेत. हायस्पीड रेल्वे चाचणीदरम्यान लोहमार्गावर नागरिकांनी थांबू नये काळजी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या (Central Railway) अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
सोलापूरवाडी ते आष्टी लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून २९ व ३० डिसेंबर रोजी जलदगती चाचणी होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ८ दरम्यान सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. या मार्गावरील पिंपळा, कुंटेफळ, कुंभेफळ, चिंचोली, धानोरा, साबलखेड, कडा, शेरी, जळगाव मांडवा, कासारी, राधापूर व आष्टी या गावातील नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून सुचना जारी करण्यात आल्या आहेत.
सोलापुरवाडी ते आष्टी रेल्वेमार्गावर लोकांनी थांबू नये, आपली जनावरे बांधू नयेत, आपल्या जीवाची काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यअभियंता (निर्माण) मध्य रेल्वे अहमदनगरच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तशी कल्पना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे आष्टी, अंभोरा यांना देण्यात आली आहे.
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या अंतर्गत अहमदनगर ते आष्टी या ६४ किलोमीटर रेल्वेमार्गाचे तसेच पूल, स्टेशन आदी कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. नगर-आष्टी या मार्गावर ताशी १४४ किलोमीटर धावणाऱ्या हायस्पीड रेल्वेची चाचणी करण्यात येणार होती. २९ व ३० डिसेंबरला ही चाचणी होणार असल्याचे मध्य रेल्वे विभागाने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. {High speed train to run on Solapurwadi to Ashti railway line on 29th and 30th December)
अहमदनगर-बीड रेल्वेमार्गासाठी अंदाजे २ हजार ८२६ कोटी रुपये खर्च येणार आहे. नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारने समान निधी देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार राज्य सरकारने या रेल्वेमार्गासाठी ९० कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तशी घोषणा हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने केली आहे.