धक्कादायक : बसस्थानकात बस चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, लक्ष्मीपूजनादिवशी उडाली मोठी खळबळ
पगारवाढ नाही, अधिकारी ऐकत नाहीत, तुटपुंजा पगारावर कुटुंब कसे चालवायचे ?
राजेंद्र जैन । आष्टी : एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. रोज कुठे ना कुठे अप्रिय घटना घडत आहेत. बसचालक वाहक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आष्टी तालुक्यातील कडा बसस्थानक परिसरातून समोर आली आहे.कडा बसस्थानकात एका बसचालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सुत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी ( दि. ४ ) दुपारी आष्टी आगाराच्या जामखेड-पुणे एसटी बसच्या चालकाने कडा येथील बसस्थानकात तीन वाजेच्या सुमारास चहा पाण्यासाठी बस उभा करून बसस्थानक परिसरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना दिसताच नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला प्रथम कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
ऐन दिवाळीच्या दिवशी ड्युटीवर असताना एसटीच्या बस चालकाने औषध प्राशन केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. बाळु महादेव कदम ( रा बावी ता आष्टी ) वय ४० वर्ष असे त्या बसचालकांचे नाव आहे. बाळु कदम हे मागील तीन वर्षापासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या अगोदर अहमदनगर जिल्ह्यात ते कार्यरत होते.
नेहमी प्रमाणे ते आज आष्टीवरून बस क्रमांक ( MH 20,BL 2086) ही जामखेड-पुणे ही बस घेऊन निघाले असता कडा बसस्थानकात बस पोहताच चहा, पाण्यासाठी बस उभा करून चालक बाळु कदम यांनी औषधांची बाटली घेऊन परिसरात विष प्राशन केले. ही घटना लोकांच्या लक्षात येताच वाहतुक नियंत्रक आलिशा बागवान, कँटीन चालक मुन्ना रावल, रिक्षाचालक सुरेश खंदारे, आणि त्या एसटीचा वाहक यांनी माणूसकीच्या भावनेतून तातडीने त्यांना मदत करत उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
बस चालकाने विषारी औषध का प्राशन केले, याबाबत ठोस कारण अद्याप समजले नसुन त्यांची प्रकृती आता स्थिर असून उपचार चालू असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. मोराळे यांनी सांगीतले आहे.
तुटपुंजा पगारावर कुटुंब कसं चालवायचं ?
वर्षानुवर्षे पगारवाढ नाही, वरिष्ठ अधिकारी एसटी कर्मचा-यांच्या व्यथा जाणून घेत नाहीत. अशा परिस्थितीत तुटपुंजा पगारावर आम्ही आमचे कुटूंब कसे चालवायचे, असा प्रश्न उपस्थित होत असून सरकारने एसटी कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत दखल घेऊन कर्मचा-यांचे आत्महत्या सत्र थांबवणे गरजेचे असल्याचे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे.