वैजापुर : औरंगाबाद जिल्ह्याच्या शिवसेनेतील अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे.वैजापूरात (Vaijapur) शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला आहे. वैजापूर शहरातील वसंत क्लबमध्ये (Vasant club Vaijapur) आयोजित ऑनलाईन शिवसंवाद (online Shiv sanwad miting) बैठकीत पक्षांतर्गत मतभेद समोर आले. बैठकीत तक्रार केल्याच्या कारणावरून सेनेतील दोन गटांत वादाला तोंड फुटले. या वादावादीत थेट आमदारांवर खुर्ची भिरकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शिवसेनेच्या ऑनलाईन बैठकीत तक्रार केल्यावरून वैजापुरातील शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. प्रकरण एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत गेले. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम (Former Shiv Sena taluka chief Sanjay Nikam) यांनी थेट आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare) यांच्यावर खुर्ची फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांनी पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बुधवारी (दि. १२) ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. वैजापुरातील वसंत क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला.
बैठकीत विषयाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय निकम (Sanjay Nikam) यांनी पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या. पदाधिकारी हे कार्यकर्त्यांना बैठकीला बोलावत नाहीत, विश्वासात घेत नाहीत; तालुक्यात पक्षाची परिस्थितीत बिकट झाली आहे. कोणाचाही वचक राहिलेला नाही. अंतर्गत हेवेदावे वाढले असल्याने तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. अशा प्रकारची तक्रार निकम यांनी दानवे यांच्याकडे ऑनलाईन बैठकीत केली.
त्यानंतर काही क्षणांतच वादाला सुरुवात झाली. शिवसेनेतील दोन गटांतील कार्यकर्त्यांची खदखद या निमित्ताने बाहेर पडली. हा वाद इतका विकोपाला गेला की, निकम यांनी शिवीगाळ करून आमदार रमेश बोरनारे यांच्यावर खुर्ची फेकून मारली. त्यामुळे दोन गटांतील पदाधिकारी हाणामारीला उतरले होते, तेव्हा उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.निकम यांनी यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांनाही चांगले फैलावर घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
वैजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काही दिवसांपासून पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे. रमेश बोरनारे हे आमदार झाल्यापासून त्यात आणखी वाढच होत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. माजी आमदार आर. एम. वाणी यांचे निधन झाल्यानंतर मात्र, पक्षांतर्गत असलेली ही खदखद उग्र रूप धारण करून हाणामारीपर्यंत प्रकरण गेले आहे. तालुक्यात पक्षवाढीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पदाधिकारी पक्षापासून दुरावले आहेत. तालुक्यात दोन-तीन जणच पक्ष चालवत असल्याचा आरोपही या बैठकीत झाला.