Breaking News : मोल्टास कंपनीत भीषण स्फोट,पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील घटनेचा व्हिडिओ आला समोर
Moltas company : पालघरच्या मोल्टास कंपनीत शनिवारी दुपारी अचानक भीषण स्फोट झाला. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत (Boisar Tarapur MIDC Palghar) घडली. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठे हादरे बसले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील मोल्टास कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेनंतर कारखान्याला भीषण आग लागली. आग लागताच कारखान्यातील कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली.प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.
मोल्टास कंपनीत नेहमीप्रमाणे कामगार काम करत असताना अचानक दुपारी 12 च्या सुमारास कारखान्यात भीषण स्फोट होऊन कारखान्याला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की आगीचे आणि धुराचे लोळ लांबच लांब पसरले. दरम्यान, आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी वेळीच बाहेर धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. धुराचे लोट पाहून अनेकांनी परिसरातून पळ काढला.
दरम्यान, स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.